माजी क्रिकेटपटूच्या मुलाने केलेली लिंगबदल प्रक्रिया नेमकी कशी? रुग्णाच्या प्रायव्हेट पार्ट्ससोबत ‘या’ अवयवयांचा आकारही बदलतो
लिंगबदल प्रक्रियेमध्ये प्रायव्हेट पार्ट्ससोबतच रुग्णाचा चेहरा, केस, कान ,अगदी नखांचा आकारही बदलतो. त्यामुळे ही प्रक्रिया नक्की कितपत सुरक्षित आहे का?, यात काय धोके असू शकतात याविषयी जाणून घेणे महत्त्वाचे असते.
आजकाल आपण लिंगबदल प्रक्रियेबद्दल नेहमीच ऐकतो. त्यानंतर मुला-मुलींमध्ये झालेला बदलही दिसतो. पण या प्रक्रियेतून जात असताना त्यांच्या शरिरात नेमके काय बदल होतात किंवा नेमकं काय घडतं हे नक्कीच कोणाला माहित नसतं.
सध्या असाच एक किस्सा म्हणजे भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांच्या मुलाने ही प्रक्रिया केली आहे. संजय बांगर यांचा मुलगा आर्यन याने लिंगबदल शस्त्रक्रिया केली आहे. ज्यानंतर तो पूर्णपणे एक मुलगी झाला आहे. या बातमीने इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. बांगर यांच्या मुलावर नुकतीच हार्मोनल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली. 10 महिन्यांच्या शस्त्रक्रियेनंतर त्याचे रूपांतर आर्यनमधून अनायामध्ये झाले आहे. त्याने इंस्टाग्रामवर त्याच्या परिवर्तनाची रील देखील शेअर केली आहे.
दरम्यान लिंग बदलण्याची प्रक्रिया नक्की कशी असते?
लिंग बदलण्याची प्रक्रिया खूप लांब आणि खर्चिक मानली जाते. मनोवैज्ञानिक मूल्यांकनानंतर, रुग्णाला हार्मोन थेरपी दिली जाते. त्याच्या शरीरात हार्मोन्स बदलण्यासाठी औषधे दिली जातात. यानंतर शरीरात हार्मोनल बदलही होतात आणि त्यानंतरच शस्त्रक्रिया करण्यात येते. जर स्त्रीला पुरुष बनायचे असेल तर 33 प्रकारच्या वैद्यकीय प्रक्रियेतून जावं लागतं. तर, पुरुषाला जर स्त्री बनायचे असेल तर त्याला 18 प्रकारच्या वैद्यकीय प्रक्रियेतून जावे लागतं.
लिंग बदल कोण करू शकतो?
आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, कोणीही असे लिंग बदलू शकत नाही. लिंग बदलण्याच्या प्रक्रियेला जेंडर रिअसाइनमेंट शस्त्रक्रिया म्हणतात. जेंडर आयडेंटिटी डिसऑर्डर अंतर्गत येणाऱ्या लोकांमध्येच लिंग बदल होऊ शकतो. म्हणजे ज्यांना जेंडर डिसफोरिया आहे, तेच ही प्रक्रिया करू शकतात. जेंडर डिसफोरियामध्ये, स्त्रीला पुरुषासारखे जगायचे असते आणि पुरुषाला स्त्रीसारखे जगायचे असते.
लिंग डिसफोरियाची लक्षणे 10 ते 11 वर्षे वयाच्या व्यक्तीमध्ये दिसू लागतात. 18 वर्षांनंतर, व्यक्तीचे मनोवैज्ञानिक मूल्यांकन केले जाते आणि जर त्याला लिंग डिसफोरिया असेल तर त्याला लिंग बदलाची वैद्यकीय प्रक्रिया करण्याची परवानगी दिली जाते.
पुरुष किंवा महिलांच्या शरिरात कोणते बदल होतात?
शरीरात हार्मोनल बदल झाल्यानंतर शस्त्रक्रियेद्वारे पुरुष किंवा महिलांच्या प्रायव्हेट पार्टचा आकार बदलला जातो. प्रायव्हेट पार्ट्ससोबतच रुग्णाचा चेहरा, केस, कान आणि अगदी नखांचा आकारही बदलतो. जर एखादा पुरुष स्त्री बनण्याच्या प्रक्रियेतून जात असेल तर त्याचे स्तन त्याच्या शरीराच्या मांसाच्या मदतीने बनवले जातात. स्तनाच्या पुनर्रचना शस्त्रक्रियेला चार ते पाच तास लागतात.
सामान्यतः, लोक पुरुषापासून स्त्रीमध्ये रूपांतरित होण्यासाठी सर्व प्रक्रियांचे पालन करत नाहीत आणि काही महत्त्वपूर्ण प्रक्रिया करतात. जर 18 प्रक्रिया फॉलो केल्या तर या प्रक्रियेला तीन वर्षे लागतात. जर एखाद्या स्त्रीला पुरुष बनायचे असेल तर तिचे प्रायव्हेट पार्ट बनवणे, आकार देणे, स्तन काढून टाकणे आणि शरीराच्या इतर अवयवांना आकार देणे हे काम खूपच गुंतागुंतीचे असते. ही प्रक्रिया वर्ष घेते तसेच खूप महाग देखील असते.
लिंग बदलण्याचे धोके असतात का?
अनेक वेळा लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेनंतर संसर्ग होण्याचा धोकाही असतो. याशिवाय, संपूर्ण हार्मोनल बदलांच्या कमतरतेमुळे, लिंग बदल करणाऱ्या लोकांमध्ये मानसिक विकार देखील आढळून आले आहेत. तसेच जर एकदा लिंग बदलाची शस्त्रक्रिया झाली तर स्त्रीपासून पुरुष झालेली व्यक्ती पुन्हा इच्छा असूनही स्त्री होऊ शकत नाही आणि मुलाला जन्म देऊ शकत नाही.