Curry Leaves for Dandruff: थंडीत कोंड्याची समस्या वाढल्याने झालात हैराण ? कढीपत्त्याचा वापर ठरेल गुणकारी
केसांमध्ये कोंडा होणं ही एक सामान्य समस्या आहे पण त्याची वेळेवर योग्य काळजी न घेतल्यास केसांचे मोठे नुकसान होऊ शकते. थंडीच्या दिवसांत कोंड्याची समस्या वाढते, त्यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही कढीपत्त्याचा वापर करू शकता.
नवी दिल्ली – केसांमध्ये कोंडा होणे (dandruff problem in hair) ही एक सामान्य समस्या आहे, परंतु हिवाळ्यात याचा त्रास खूप वाढतो. हिवाळ्यात कोंडा वाढल्याने केस गळण्याचे (hair fall) प्रमाणही अनेक पटींनी वाढते. केसांची नीट स्वच्छता न केल्यास कोंड्याची समस्या वाढते आणि केसांची मुळे कमकुवत होतात. कोंडा वाढल्यामुळे कधी कधी स्काल्पला खाज येणे व जळजळ होणे अशी समस्या उद्भवते. हिवाळ्यात केसांची वाढ (hair growth) टिकवण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते.
जर तुम्हीसुद्धा थंडीच्या दिवसात कोंड्याच्या समस्येने त्रस्त असाल तर कढीपत्त्याचा वापर करून हा त्रास दूर करू शकता. कढीपत्त्यात प्रोटीन, जीवनसत्त्व, लोह आणि असे अनेक पोषक घटक आढळतात, ज्यामुळे केसांची वाढ होते आणि ते मजबूतही होतात. कढीपत्ता केसांना पोषक द्रव्ये पुरवून केसांना लांब आणि दाट बनवतो. केसांच्या चांगल्या वाढीसाठी तुम्ही कढीपत्ता वापरू शकता.
दह्यासोबत कढीपत्त्याचा वापर
स्काल्पवर कोंडा खूप वाढला असेल तर कढीपत्ता दह्यासोबत वापरावा. मूठभर कढीपत्ता सुमारे 20 मिनिटे पाण्यात भिजवा आणि नंतर बारीक वाटा. नंतर कढीपत्त्याच्या पेस्टमध्ये दोन चमचे दही मिसळा आणि नंतर ते टाळूला लावा. ही पेस्ट सुमारे 30 मिनिटे राहू द्यावी, नंतर सौम्य शांपूने केस धुवून टाकावेत.
कढीपत्त्याचे पाणीही फायदेशीर
कोंड्याच्या समस्येवर कढीपत्त्याचे पाणीही खूप फायदेशीर ठरते. यातील पोषक घटक स्काल्पवरील घाण काढून टाकतात, ज्यामुळे केसांना चमक येते आणि केसांची वाढही होते. कढीपत्त्याची 20-25 पाने पाण्यात उकळवा आणि नंतर पाणी गाळून घ्यावे. केस शॅम्पूने धुतल्यानंतर कढीपत्त्याचे पाणी स्काल्प आणि केसांना लावावे. हे काही आठवडे करा, तुमच्या कोरड्या केसांमध्ये फरक दिसून येईल.
कढीपत्ता आणि खोबरेल तेलाचा वापर
जर हिवाळ्यात केसांमध्ये कोंड्याची समस्या वाढली असेल तर तुम्ही खोबरेल तेलासोबत कढीपत्त्याचा वापर करा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. एका पॅनमध्ये खोबरेल तेल घ्या आणि त्यामध्ये 15-20 कढीपत्त्याची पाने घाला. ते चांगले उकळवा. आता मिश्रण थंड होऊ द्या आणि हे तेल स्काल्पला आणि केसांना नीट लावा. नंतर डोक्याला 10 मिनिटे मसाज करा आणि एका तासानंतर डोकं शांपूने धुवा.
कढीपत्ता आणि कापूर
कोंड्याच्या समस्येवर कढीपत्ता आणि कापूरानेही मात करता येते. कढीपत्ता आणि कापूर या दोन्हीमध्ये अँटीफंगल गुणधर्म आहेत आणि ते कोंडा काढून टाकण्यास मदत करतात. यासाठी कढीपत्त्याची 10-15 पाने बारीक करून घ्या आणि त्यात कापूर तेल मिसळा. दोन्ही नीट एकत्र करा आणि केसांना लावा. काही दिवस हे तेल लावल्याने फरक दिसून येईल आणि कोंड्याची समस्या दूर होईल.