मकर संक्रांतीला करा तिळगुळाचे लाडू, जाणून घ्या सोपी रेसिपी
हिवाळ्यामध्ये येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. यामुळे या दिवसात गुळाचे आणि तिळाचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. मकर संक्रांतीला अनेक घरांमध्ये तिळगुळाचे लाडू तयार केले जातात. तिळगुळाचे लाडू तयार करताना योग्य पद्धत माहिती नसल्याने तिळगुळाचे लाडू बिघडतात. जाणून घेऊ तिळगुळाचे लाडू बनवण्याची योग्य पद्धत.
नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर पहिला सण मकर संक्रांत हा असतो. हा हिंदू धर्मातला महत्त्वाचा सण मानला जातो. जेव्हा सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. हा सण देशभरातील राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. या दिवशी तीळ आणि गुळाचे लाडू बनवण्याची परंपरा आहे. मकर संक्रांत हा सण हिवाळ्यात येत असल्यामुळे या सणाला तिळापासून बनवलेल्या गोष्टी खाल्ल्या जातात. प्रत्येक घरामध्ये संक्रांतीला तिळ गुळाचे लाडू तयार केले जातात. या मकर संक्रांतीला तुम्ही तिळगुळाचे लाडू बनवणार असाल तर जाणून घ्या सोपी रेसिपी.
तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी साहित्य
गुळ
तीळ
वेलची पूड
शेंगदाणे
बदाम
किसलेले खोबरे
काजू
कृती
सर्वप्रथम तीळ स्वच्छ करून घ्या त्यामध्ये खडे किंवा कचरा नाही याची खात्री करून घ्या. यानंतर एका जाड तळ असलेल्या पान ठेवा आणि मंद आचेवर तीळ थोड्यावेळ भाजून घ्या. तीळ तडतडायला लागले आणि हलके सोनेरी दिसू लागले की गॅस बंद करा आणि तीळ एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवा.
तीळ भाजल्यानंतर त्याच पॅनमध्ये शेंगदाणे नीट भाजून घ्या म्हणजे त्यांचा कच्चापणा निघून जाईल आणि ते थोडे कुरकुरीत होतील. त्यानंतर एक कपडा घेऊन शेंगदाणे चोळून घ्या ज्यामुळे त्याची साले निघून जातील. बदामाचे छोटे छोटे तुकडे करून ते गावरान तुपामध्ये भाजून घ्या. यानंतर किसलेले खोबरे ही थोडेसे सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. तीळ आणि शेंगदाणे दोन्ही मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या.
मंद आचेवर एक पॅन ठेवून त्यामध्ये गुळाचे छोटे छोटे तुकडे करून टाका आणि गूळ वितळून घ्या. गुळ वितळण्यासाठी चुकूनही पाण्याचा वापर करू नका हळूहळू गूळ वितळल्यानंतर तो घट्ट चिकट पदार्थासारखा तयार होईल. गुळ पूर्णपणे विरघळल्यानंतर तीळ आणि शेंगदाणे त्यासोबतच वेलची पूड, किसलेले खोबरे, बदाम इत्यादी साहित्य घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता हाताला तूप लावा आणि लाडू बनवायला सुरुवात करा. मिश्रण पूर्णपणे थंड होण्यापूर्वी तुमचे लाडू तयार करा. हे मिश्रण थंड झाल्यानंतर मिश्रणाला लाडूचा आकार देणे शक्य होणार नाही.