माथेरान, महाबळेश्वर विसरा, सर्वात कमी बजेटमध्ये येथे करा हनिमून
हनिमूनसाठी चांगलं ठिकाणं म्हटलं की, पहिले लक्ष खिशाकडे जातं. कितीही इच्छा असली तरी बाहेर जाता येत नाही. अशावेळी ही पाच ठिकाणे तुमच्या मदतीला धावून येतील. ही ठिकाणे ‘चांगली’ आहेतच शिवाय खिशाला परवडणारी आहे. त्यामुळे अगदी १ लाखाच्या आत आठवडाभर हनिमून एन्जॉय करू शकता.
मुंबई | 2 जानेवारी 2024 : हिवाळा आणि लग्नाचा सिझन आता सुरु झालाय. आठवड्यातून एकदा तरी कुणाच्या ना कुणाच्या लग्नाला जावं लागतंय. त्यामुळे खिशाला चाट बसत असला तरी नातेसंबंध जपण्यासाठी तिथं उपस्थित रहावचं लागतं. नव जोडप्याला आशीर्वाद देऊन जेवण तृप्तीचा ढेकर देऊन समाधानानं घरी परततो. तर, इकडे नव्या जोडप्याला टेन्शन आलेलं असतं ते हनिमुनचं. लग्नासाठी झालेला खर्च, त्यामुळे हनिमुनसाठी स्वस्त आणि जवळचं ठिकाण शोधलं जातं. अनेक जण यासाठी महाबळेश्वर किंवा माथेरान या ठिकाणांना पसंती देतात. मात्र, अगदी कमी बजेटमध्येही भारतातील या ठिकाणी तुम्ही हनिमुनचे चार पाच दिवस अगदी आनंदात घालवू शकता.
थोडं महाग पण परवडणारं अंदमान निकोबार
अंदमान निकोबार बेटावरचा प्रवास म्हणजे निव्वळ आनंद… या बेटाची सफर थोडी महाग असली तरी ती 1 लाखांच्या आत बसते. येथे एका आठवड्यासाठी दोन व्यक्तींना सुमारे ६० हजार ते ७० हजार खर्च येतो. पण, वेगवेगळ्या गोष्टी अनुभवण्यासाठी हे बेट उत्तम आहे. स्कूबा ड्रायव्हिंग, स्नॉर्कलिंग, हेरिटेज वॉक, अनेक प्रसिद्ध बेट यासोबतच मोठे समुद्रकिनारे हे इथले वैशिठ्य आहे. पोर्ट ब्लेअर, हॅवलॉक, रॉस आयलंड सारखी ठिकाणे तुमचे लक्ष वेधून घेतात. म्हणूनच याला ऍडव्हेंचर आणि रोमान्सचं नंदनवन म्हटलं जातं.
दार्जिलिंग : सुगंधी दरवळ चहाचा, आनंद हनिमुनचा
दार्जिलिंगमध्ये उंच बर्फाळ शिखरं, चहाचे मोठे मळे, मठ, खोल दऱ्या, त्यांच्या बाजूला खडा पहारा देणारे निसर्गरम्य डोंगर हे दृश्य डोळ्यात न सामावणारे असेच. निसर्गाचे रूप डोळ्यात साठवताना जोडीदारासोबत येणारा अनुभव हा कायम लक्षात राहिलं असाच असेल. दार्जिलिंगमध्ये फिरण्यासारखी खूप ठिकाणे आहेत. इथल्या वूलनच्या कुणीही प्रेमात पडावं. इथे एका दिवसाचा खर्च साधारण चार ते साडेचार हजार इतका येतो. म्हणजेच आठवड्याचा खर्च ५० हजारांच्या आतच होतोय.
‘भारताचं स्कॉटलंड’कूर्ग, स्पीचलेस करणारे धबधबे
कर्नाटकमध्ये प्रसिद्ध असलेलं थंड हवेचं ठिकाण म्हणजे कूर्ग. भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या तिबेटी वस्तीची घरे येथे आहेत. त्यामुळे हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्याबरोबरच सांस्कृतिक केंद्रही मानलं जातं. कुर्गळा ‘भारताचं स्कॉटलंड’ म्हणूनही ओळखलं जातं. चहा आणि कॉफीचे मळे, स्पीचलेस धबधबे, उंच टेकड्या यामुळे येथील वातावरण निसर्गरम्य असतं. मडिकेरी किल्ला, ओंकारेश्वर मंदिर, ब्रम्हगिरी, मंडलपट्टी, रिव्हर राफ्टिंग अशा खुप गोष्टींचा आनंद इथे घेता येईल. या ठिकाणी ३ दिवसांचा खर्च साधारण १२ ते १४ हजार इतका येईल. भारतातील स्वस्त हनिमून डेस्टिनेशन म्हणून कुर्गला जास्त पसंती आहे.
अतुलनीय आदरातिथ्य करणारं केरळ
आपल्या जोडीदारासह निसर्गरम्य ठिकाणी हनिमून रोमँटिक करायचा असेल तर केरळ हे एक बेस्ट डेस्टिनेशन आहे. इथे तुमचं होणारं आदरातिथ्य यामुळे भारावून जायला होतं. अथिरापल्ली, अलेप्पी, वायनाड ही ठिकाणे बेकलचे किल्ले, समुद्रकिनारा असा अनेक ठिकाणी जावू शकता. येथील वास्तुशैलीचं सादरीकरण करणारी मंदिरं निराळीच. प्रायव्हेट स्पेस थोडीही डिस्टर्ब न होऊ देता या ठिकाणांचा आनंद येथे घेऊ शकता. केरळमध्ये दोघांसाठी एका दिवसाचा साधारण पाच हजार आणि आठवडाभर राहिलात तर जास्तीत जास्त ४० हजार खर्च येईल.
नावातच सगळं काही : गोवा
महराष्ट्राला लागून असलेलं हे छोटं राज्य गोवा. जाण्यायेण्याचा दोन दिवसांचा प्रवास टाळायचा असेल तर गोवा हा उत्तम पर्याय आहे. दोघंही पार्टनर पार्टी लव्हर असाल तर यासारखं दुसरं ठिकाण नाही. विस्तीर्ण समुद्र, खवय्यांची चंगळ, शॉपिंगसाठी युनिक मार्केट ही गोव्याची खासियत. सकाळी डॉल्फिन शोधण्यासाठी बोटीने प्रवास आणि रात्री टेन्ड किंवा पबमध्ये नाईट लाइफचा अनुभव कायम लक्षात रहावा असाच. गोवाय्त कपलला एका दिवसाचा खर्च सहा हजार पर्यंत येतो. आठवड्याभराचा खर्च फार फार तर 50 हजार येईल.