उन्हाळ्यात घामाच्या त्रासाने हैराण आहात? ‘फ्रेश’ राहण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा!
उन्हाळ्यात घाम येणं थांबवणं शक्य नसले तरी या काही सोप्या टिप्स वापरून तुमला घामावर नियंत्रण ठेवता येणं सहज शक्य आहे.

एप्रिल-मे महिन्यांत उन्हाची तीव्रता वाढत असताना, घाम येणं ही एक सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया असली तरी, काही वेळा हे त्रासदायक देखील ठरू शकतं. शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी घाम येतो, परंतु सतत घाम येणं, कपड्यांचा ओलसरपणा आणि त्यातून होणारी दुर्गंधी यामुळे अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी लाजीरवाणी स्थिती निर्माण होते. विशेषतः कामाच्या ठिकाणी, शाळेत किंवा गर्दीत सतत ओले कपडे आणि घामाचा वास हा आत्मविश्वास कमी करू शकतो.
याशिवाय, घामाच्या सतत संपर्कामुळे त्वचेवर बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते आणि त्यामुळे बऱ्याचदा स्किन इन्फेक्शन, खरूज, पुरळ आणि खाज यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
१. योग्य कपड्यांची निवड करा
उन्हाळ्यात कपड्यांची निवड तुमचं आरोग्य ठरवू शकते. कापूस, तागा किंवा रॅमी यासारख्या नैसर्गिक फॅब्रिकचे कपडे वापरल्यास घाम त्वरीत शोषला जातो आणि शरीर थंड राहते. याशिवाय, सैलसर आणि हलक्या रंगाचे कपडे उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करतात. घट्ट कपड्यांमुळे त्वचेला हवा मिळत नाही आणि दुर्गंधी व खाज यांसारख्या समस्या निर्माण होतात.
२. आहारात थंड पदार्थांचा समावेश करा
उन्हाळ्यात मसालेदार, तेलकट आणि कॅफिनयुक्त पदार्थ टाळावेत. हे अन्न शरीराचे तापमान वाढवतं आणि घाम जास्त प्रमाणात येतो. त्याऐवजी नारळ पाणी, ताक, दही, काकडी, कलिंगड आणि लिंबूपाणी यांचा आहारात समावेश केल्यास शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो आणि घाम येणं नियंत्रणात राहतं.
३. बायोफीडबॅक थेरपीचा विचार करा
अती घाम येणं ही ‘हायपरहायड्रोसिस’ नावाची वैद्यकीय स्थिती असू शकते. अशावेळी बायोफीडबॅक थेरपी उपयुक्त ठरते. या थेरपीद्वारे शरीरातील घामाच्या प्रमाणावर लक्ष ठेवून, तुमचं मन आणि शरीर तणावमुक्त करायला मदत मिळते.
४. थंड पाण्याचा वापर करा
दिवसभरात शक्य तितक्या वेळा थंड पाण्याने चेहरा, हात-पाय स्वच्छ धुणं आवश्यक आहे. याशिवाय, अंडरआर्म्स, मान किंवा पाठीवर बर्फाचा थंड कपडा ठेवून शरीराचं तापमान कमी करता येतं.