उद्धव अन् रश्मी ठाकरे यांची कशी झाली ओळख? दोघांचे लग्न कसे जमले?
डोंबिवलीमधील मध्यमवर्गीय कुटुंबातील रश्मी ठाकरे. त्याचे लग्नापुर्वीचे आडनाव पाटणकर. रश्मी पाटणकर यांनी मुलुंडच्या वझे-केळकर कॉलेजमधून पदवी पुर्ण केली. त्यानंतर १९८७ साली एलआयसीमध्ये नोकरी सुरु केली.
मुंबई : राजकारणातील शांत व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा संघर्षकाळ सुरु आहे. या संघर्षात काही खेळाडूंना सोबत घेऊन ते जोरदार फलंदाजी करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या राजकीय प्रवासात रश्मी ठाकरे कायम खंबीरपणे त्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या. शिवसेनेची धुरा हाती घेतल्यापासून उद्धव ठाकरे यांनी अनेक कसोटीचे क्षण अनुभवले. या सर्व कठीण काळात उद्धव ठाकरे यांना पत्नी रश्मी यांनी खंबीर साथ दिली. आज व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) साजरा होत असताना उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचं लग्न कसे जुळले? याची माहिती अनेकांना नाही.
रश्मी पाटणकर ते रश्मी ठाकरे
डोंबिवलीमधील मध्यमवर्गीय कुटुंबातील रश्मी ठाकरे. त्याचे लग्नापुर्वीचे आडनाव पाटणकर. रश्मी पाटणकर यांनी मुलुंडच्या वझे-केळकर कॉलेजमधून पदवी पुर्ण केली. त्यानंतर १९८७ साली एलआयसीमध्ये नोकरी सुरु केली. यावेळी त्यांची ओळख जयवंती ठाकरे यांच्याशी झाली.
जयवंती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहीण. मग रश्मी पाटणकर यांचे ठाकरे परिवारात जाणे-येणे सुरु झाले. जयवंती यांच्या माध्यमातून रश्मी आणि उद्धव ठाकरे यांची ओळख झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे राजकारणात नव्हते. पण उद्धव ठाकरे यांच्या मागे बाळासाहेब ठाकरे यांचं एक प्रचंड मोठं वलय होते. तसे काही रश्मी ठाकरे यांच्या बाबतीत नव्हते. उद्धव ठाकरे जे जे स्कुल ऑफ आर्टमध्ये आपल्या आवडत्या विषयावर शिक्षण घेत होते. त्यांचा सर्वात जास्त वेळ फोटोग्राफीमध्येच जात होता.
ओळखीचे रुपातंर मैत्रीत
रश्मी पाटणकर आणि उद्धव यांची ओळख हळूहळू मैत्रीत बदलली. त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. उद्धव ठाकरे रश्मी यांना भेटण्यासाठी लोकलने प्रवास करून डोंबिवलीला जात होते, असे सांगितले जात होते. पुढे १३ डिसेंबर १९८८ ला दोघांचं लग्न झालं.
शिवसैनिकांच्या रश्मीवहिनी
रश्मी ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे कोणतेही पद नाही. त्या राजकारणात सक्रीय नाहीत. परंतु मातोश्रीवर रहात असल्यापासून त्यांनी शिवसेना आणि शिवसैनिक यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते तयार केले. ठाकरे कुटुंब राजकारणाच्या रणांगणात कार्यरत असताना घर रश्मी ठाकरे सांभाळायच्या.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मातोश्रीवर येणारा प्रत्येक माणूस, त्यांची कामं याकडे त्या जातीने पहायच्या. प्रत्येकाच्या जेवणाची व्यवस्था, प्रत्येकाची सोय, घरातील नियोजन सांभाळताना प्रत्येकाची जातीने विचारपूस करायच्या. त्यामुळे त्या प्रत्येक शिवसैनिकाच्या रश्मीवहिनी झाल्या.