व्यायामामुळे शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यावरही होतील हे सकारात्मक बदल
व्यायामाचे केवळ शारीरिकच फायदे होतात असे नाही. याचे आपल्या मानसिक आरोग्यावरही अनेक सकारात्मक बदल होत असतात. त्यामुळे अनेकांकडून व्यायाम करण्याचा सल्ला दिला जात असतो. शरीराच्या रोजच्या क्रियाकलापामुळे तसेच व्यायामामुळे डोक्याच्या केसांपासून तर पायाच्या नखांपर्यंत अनेक चमत्कारी फायदे होतात.
आपण पूर्वीपासून ‘आरोग्यम् धन संपदा’ हा मुलमंत्र ऐकत आलो आहोत. शरीर तंदुरुस्त तरच मन तंदुरुस्त राहत असते. त्यामुळे साहजिकच यात शारीरिक आरोग्याला अत्यंत महत्व लाभले आहे. आपल्या आरोग्यालाच धन संपदेची उपाधी देण्यात आली आहे. परंतु हल्लीच्या धावपळीच्या जीवनात शरीराकडे पुरेशा प्रमाणात लक्ष दिले जात नाही. बदलत्या जीवनपध्दतींमुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण झालेल्या आहेत. सकाळचा व्यायाम (exercise), सकस आहार व पुरेशी झोप या तीन गोष्टी निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यातील व्यायामाचा विचार केल्यास, शारीरिक तंदुरुस्तीसह मानसिक आरोग्य (mental health) चांगले ठेवण्यासाठीही त्याला पर्याय नाही. शारीरिक क्रियाकलापाने मानसिक आरोग्यदेखील चांगले ठेवण्यास मदत होत असते. व्यायामाचे मानसिक आरोग्यावर होणारे फायदे (benefits) या लेखातून बघणार आहोत.
- शारीरिक हालचालींमुळे स्नायूंना आराम मिळत असतो. शरीरातील ताण कमी होतो. शरीराला बरं वाटलं तर परिणामी आपोआप मनही निरोगी राहण्यास मदत होत असते. व्यायामामुळे आत्मिक समाधान मिळत असते. मन प्रसन्न राहण्यास मदत होते.
- व्यायाम केल्याने शरीरातील रक्ताभिसरण योग्य रीतीने होते, त्यामुळे शरीराचा प्रत्येक भाग तंदुरुस्त तर राहतोच, शिवाय त्यांचे कार्यही व्यवस्थित चालू राहते. व्यायामादरम्यान शरीरातून ‘एंडोर्फिन्स’ बाहेर पडतात ज्यामुळे आपला मेंदू तीक्ष्ण होतो व त्याची कार्यक्षमताही वाढीस लागते.
- नियमित व्यायामामुळे तुमच्या ‘सेल्फ इस्टीम’ला बूस्ट मिळतो आणि त्याचा परिणाम व्यक्तीच्या स्वाभिमानावरही होतो. त्याचप्रमाणे तुम्ही तंदुरुस्त राहिल्यास तुम्हाला आतून चांगले वाटते व आत्मविश्वास वाढतो.
- शारीरिक हालचालींमुळे मन शांत राहते आणि चांगली झोप लागते. जर तुम्हाला झोपेची समस्या असेल तर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत व्यायामाचा आवर्जुन समावेश करायला हवा.
- तुमचा मूड दिवसभर आनंदी आणि फ्रेश ठेवण्यासाठी सकाळी 25-30 मिनिटांचा व्यायाम पुरेसा आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या कामात उत्साह वाटतो. डोक्यात नवीन कल्पना येतात, कामात प्रगती होते. त्यामुळे तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी व्यायामासाठी थोडा वेळ काढा.