भारतातील अशी ठिकाणं जिथे तुम्हाला 1 रुपयाही खर्च करावा लागणार नाही; जेवण आणि राहणेही आहे फ्री!
भारतातील अशाच काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्हाला राहण्यासाठी आणि खाण्यासाठी एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. त्यामुळे तुम्ही जर अगदीच कमी खर्चात सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर ही सर्व ठिकाणे तुमच्यासाठी ठरतील सगळ्यात स्वस्त.
फिरायला जायला कोणाला आवडत नाही, आणि त्यात जर आपल्या बजेटपेक्षाही अगदी निम्म्या खर्चात फिरायला जायला मिळालं तर आहेना ‘सोने पे सुहागा’. मात्र काहीवेळा सीझनअसल्यावर हॉटेल्सचे दर प्रमाणापेक्षा वाढवले जातात त्यामुळे प्रवास करणे आणि फिरणे हे सगळंच मर्यादित करण्याची वेळ येते. या अनेक कारणांमुळे लोक त्यांचे प्रवासाचे बेतच रद्द करतात.
राहणे आणि चांगले जेवण हे कोणत्याही सहलीचे सर्वात महत्वाचे भाग आहेत. त्यासाठी मग पैसे तर खर्च करावेच लागतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही मोफत राहू शकता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही विनामूल्य राहू शकता. त्यामुळे तुम्हाला सहलीचे नियोजन करताना बजेटची काळजी करण्याची गरजच लागणार नाही.
अशी ठिकाणं जिथे मोफत राहणे शक्य
मणिकरण साहिब गुरुद्वारा (हिमाचल प्रदेश)
दिल्ली किंवा त्याच्या आसपासच्या शहरांमध्ये राहणारे बहुतेक लोक हिमाचलला भेट देतात. हिमाचल प्रदेशातील कसोल येथे असलेल्या मणिकरण साहिब गुरुद्वारामध्ये तुम्ही विनामूल्य राहू शकता. येथे मोफत राहण्यासोबतच तुम्हाला मोफत पार्किंग आणि मोफत भोजन म्हणजेच लंगर देखील मिळते. आणि हो हे गुरुद्वार अतिशय सुंदर आहे.
आनंदाश्रम (केरळ)
केरळमध्ये असलेल्या या आश्रमात स्वयंसेवक बनून विनामूल्य तुम्ही राहू शकता. मोफत राहण्यासोबतच आश्रमात जेवणही मोफत मिळते. आश्रमात, तुम्हाला दिवसातून तीन वेळचे जेवण देखील दिले जाते, जे खूप कमी मसाल्यांनी तयार केले जाते.
गीता भवन (ऋषिकेश)
ऋषिकेशला एकदा तरी जाव ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यात दिल्ली आणि आसपासच्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांची ऋषिकेश ही पहिली पसंती असते. जर तुम्हाला इथे यायचे असेल तर इथे असलेल्या गीता भवन आश्रमात तुम्ही मोफत राहू शकता. मोफत राहण्यासोबतच तुम्हाला येथे मोफत जेवणही मिळते. आश्रमात सुमारे 1000 खोल्या आहेत जिथे जगभरातून लोक येतात आणि राहतात. आश्रमातर्फे सत्संग आणि योगासनेही दिली जातात.
ईशा फाउंडेशन
ईशा फाउंडेशन बद्दल जवळजवळ सगळ्यांनाच माहित आहे. इथे भेट देण्याची अनेकांची इच्छाही आहे. कोईम्बतूरपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. हे केंद्र योग, पर्यावरण आणि सामाजिक कार्य क्षेत्रात काम करते. इथे भेट देण्यास आल्यानंतर तुम्ही इथे विनामूल्य राहू शकता.
गोविंद घाट गुरुद्वारा (चमोली, उत्तराखंड)
हे गुरुद्वारा उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात अलकनंदा नदीजवळ आहे. येथे येणारे पर्यटक, ट्रेकर्स आणि भाविक येथे मोफत राहू शकतात. गुरुद्वारातून तुम्ही पर्वतांचे सुंदर दृश्यही पाहू शकता.