दही की ताक; उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी उपयुक्त काय?
उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी दही आणि ताक दोन्ही उपयुक्त आहेत, पण त्यात फरक आहे. दही पोषक असले तरी जाड आहे, तर ताक हलके आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने लवकर पचते आणि शरीराला जलयुक्त करते.

मुंबईसह महाराष्ट्रात तीव्र उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. वाढत्या तापमानामुळे सर्वांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. आपल्या शरीराला थंडावा मिळावा यासाठी प्रत्येकजण विविध उपाय करत असतो. उन्हाळ्यात शरीराला थंड आणि हायड्रेटेड ठेवायचे असेल तर थंड आणि पौष्टिक पदार्थ खाणे अत्यंत गरजेचे आहे. उन्हाळ्यात दही आणि ताक या दोन्ही दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केले जाते. हे दोन्ही पदार्थ पचनक्रिया सुधारण्यास, शरीराला डिटॉक्स करण्यासही मदत करतात. विशेष म्हणजे यामुळे शरीरात वाढणारी उष्णता कमी होते. आपल्यापैकी अनेक लोक दही आणि ताक हे एकसारखेच आहे असे समजतात. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. दही आणि ताकात अनेक महत्त्वपूर्ण फरक आहेत, आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
दही आणि ताकातील मुख्य फरक
दही हे घट्ट आणि पोषकतत्वांनी परिपूर्ण असे दुग्धजन्य उत्पादन आहे. दही जमवण्यासाठी दूधाची आवश्यकता असते. दूध जमा करून दही तयार केले जाते. दह्यामध्ये प्रथिने, प्रोबायोटिक्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी12 आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात आढळतात. याउलट ताक हे दही घुसळून बनवले जाते. या प्रक्रियेत दह्यातील अतिरिक्त लोणी काढून टाकले जाते. त्यामुळे ताकामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. मात्र फॅटचे प्रमाण कमी असते. याच कारणामुळे ताक हलके आणि सहज पचते.
शरीराला थंडावा देण्यासाठी दही आणि ताकात बेस्ट काय?
ताकामुळे शरीराला अधिक थंडावा मिळतो. ताक हलके असल्यामुळे आणि त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीर लवकर हायड्रेट होते. दही थंड असले तरी ते जड असते. दह्याचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील उष्णता वाढवू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात ताक अधिक फायदेशीर ठरते.
पचनक्रिया सुधारण्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता?
ताक हलके असल्यामुळे ते सहज पचते. यामुळे गॅस, अपचन आणि अॅसिडिटीसारख्या समस्या दूर होतात. दही घट्ट आणि जड असल्यामुळे काही व्यक्तींना अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पचनासाठी ताक उत्तम मानले जाते.
वजन कमी करण्यासाठी दही की ताक काय योग्य?
ताकात कॅलरी आणि फॅटची मात्रा कमी असते. यामुळे वजन कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरते. दह्यात ताकाच्या तुलनेने जास्त कॅलरी आणि फॅट असतात. यामुळे वजन वाढू शकते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ताक हा उत्तम पर्याय मानला जातो.
डिहायड्रेशनसाठी काय उपयुक्त?
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. ताकात पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. ते शरीराला डिहायड्रेट होण्यापासून वाचवते. दह्यात पाण्याची मात्रा कमी असल्याने ते हायड्रेशनसाठी मदत करत नाही. यामुळे उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी ताक अधिक उपयुक्त आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी ताक हा एक उत्तम पर्याय मानला जातो. दही पौष्टिक असले तरी उन्हाळ्याच्या विशिष्ट गरजांसाठी ताक अधिक फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे या उन्हाळ्यात आपल्या आहारात ताकाचा नियमित समावेश करणे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे.