नवी दिल्ली – आजकाल खराब जीवनशैली आणि अयोग्य आहार (unhealthy diet) यामुळे बरेच लोक वजन वाढण्याच्या (weight gain) समस्येने त्रस्त आहेत. सकाळी उठल्यावर जी दिनचर्या असते, त्याचा व्यक्तीच्या मनावर आणि आरोग्यावरही खूप परिणाम होतो. बरेच लोक दिवसाची सुरुवात अयोग्य आहाराने आणि चुकीच्या मार्गाने करतात. याचा त्यांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. सकाळी उठल्यावर काही चुका करणं टाळावं. त्यामुळे केवळ आपलं वजन नियंत्रणात (weight in control) रहात नाही तर आपला दिवस चांगला जातो. सकालच्या काही वाईट सवयी ताबडतोब सोडून देणं उत्तम…
उशिरापर्यंत झोपणे
पुरेशी झोप घेणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. मात्र बरेच लोक गरजेपेक्षा जास्त झोपतात. यामुळेही वजन वाढू शकतं. सकाळी उशिरापर्यंत झोपलं तर नाश्ताही उशिरा होतो. याचा आपल्या मेटाबॉलिज्मवर वाईट परिणाम होतो. व त्याचे कार्य मंदावते. ज्यामुळे तुम्ही लठ्ठ होऊ शकता.
पाणी न पिणे
आपणा सर्वांनाच सकाळी उठून पाणी पिण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. सकाळी पाणी न प्यायल्याने आपले शरीर डिहायड्रेटेड राहते. त्यामुळेही आपले मेटाबॉलिज्मचे कार्य मंदावते. त्यामुळे शरीरातील कॅलरीज कमी बर्न होतात व लठ्ठपणा वाढतो. सकाळी पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ अथवा टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे तुमचे मेटाबॉलिज्म सुधारते. त्यामुळे सकाळी उठल्यावर पाणी प्यायची चांगली सवय लावावी.
नाश्त्यात योग्य पदार्थांचा समावेश न करणे
अनेकजण दिवसाची सुरुवात अयोग्य व अनहेल्दी पदार्थांनी करतात. जास्त मीठ असलेले किंवा चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने वजन वाढू शकतं. अशा परिस्थितीत, तुम्ही आहारात हाय प्रोटीन्स असलेल्या पदार्थांचा समावेश करणे महत्वाचे ठरते. त्यामुळे वजन वेगाने कमी होण्यास मदत होते. प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोट बराच काळ भरल्यासारखं वाटतं.
जेवताना टीव्ही पाहणे
सकाळी नाश्ता करताना अनेक जण टीव्ही पाहतात. हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. टीव्ही बघताना आपण काय खातोय याकडे लक्ष जात नाही व जास्त खाल्ले जाते. यामुळेही वजन वाढू शकतं. त्याळेच नाश्ता करताना किंवा अगदी जेवतानाही टीव्ही पाहू नये. अन्न हळूहळू व चावून-चावून खावे.
चहात जास्त साखर घालणे
सकाळच्या चहामध्ये जास्त साखर व साय घालणे टाळावे. कॉफी आणि चहामध्ये अती साखर घातल्याने वजन वाढू शकतं. फॅट क्रीमचा वापर टाळा. या गोष्टींमुळेही तुमचं वजन वाढू शकतं.
व्यायाम
नियमित व्यायाम करणं हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे शरीरातील चरबी जळण्यास मदत होते. तुमचे रक्ताभिसरण सुधारते. त्यासाठी रोज सकाळी किमान अर्धा तास तरी व्यायाम करावा.