गुलाबी थंडीत शिमला-मनाली नव्हे, ‘या’ ठिकाणी कुटुंबासह घालवा अनमोल क्षण
तुम्हाला थंडीच्या दिवसात निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी शिमला किंवा मनालीला जाण्याची गरज नाही. हिमाचल प्रदेशातील या निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या ठिकाणांना भेट द्या.
हिवाळाच्या दिवसात हिमाचल प्रदेशात मनाला भुरळ घालणारा नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळतं. थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला शिमला व मनाली सारख्या ठिकाणी सर्वाधिक गर्दी दिसून येते. कारण डिसेंबर महिन्यात मुलांना आणि ऑफिसमधील सुट्ट्या असल्याने लोकं जास्त करून बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखतात. त्यातच अनेकदा अशा ठिकाणी गर्दी होत असल्याने आपल्याला नीट फिरता देखील येत नाही. पण तुम्हाला थंडीच्या दिवसात निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी शिमला किंवा मनालीला जाण्याची गरज नाही. यासाठी आम्ही तुम्हाला अशा काही चांगल्या ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही शिमला मनालीला जाण्याचा प्लॅन रद्द कराल. जाणून घेऊया या भव्य आणि शांत ठिकाणांबद्दल
प्रिनी गाव
मनालीजवळील प्रिनी हे छोटंसं गाव अतिशय प्रेक्षणीय ठिकाण आहे. इथे तुम्हाला फारशी गर्दी बघायला मिळणार नाही. पण मनालीप्रमाणेच तुम्हाला या ठिकाणी सुंदर आणि अप्रतिम नजारे पाहायला मिळतील. तुम्ही देखील या ठिकाणी गेलात तर इथले शांत आणि निसर्गरम्य वातावरण तुम्हाला खूप आवडणार आहे. हे गाव कुल्लू जिल्ह्यापासून ३७ किमी अंतरावर आहे. तर शिमल्यापासून या गावाचे अंतर सुमारे १४७ किमी आहे. या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या सर्व समस्या व ताण तणाव विसरू शकता.
करसोगा व्हॅली
हिमाचल प्रदेशाच्या पर्वत रांगेत वसलेले करसोगा व्हॅलीचे हे सुंदर ठिकाण पाहिल्यानंतर तुम्हाला इथून निघावेसे वाटणार नाही. आपल्या पारंपरिक चाली रीती, अनोखी लोक संस्कृती, पौराणिक मंदिर आणि सफरचंदाच्या बागेत आणि पाईन झाड चिल झाड, अक्रोड, असंख्य औषधी इत्यादीने सुशोभित अशी व्हॅली आहे. ज्याचे सौंदर्य बघण्यासारखे आहे. येथे तुम्हाला एक सुंदर मंदिरही पाहायला मिळेल. असे मानले जाते की हे मंदिर पांडवांनी बांधले होते. याशिवाय ट्रेकिंगसाठीही हे ठिकाण उत्तम आहे.
शोजा
हिमाचल प्रदेशातील सुंदर हिल स्टेशनपैकी एक असलेले शोजा हे गाव निसर्गप्रेमींसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. या ठिकाणी तुम्ही कॅम्पिंगचा आनंदही घेऊ शकता. डिसेंबर महिन्यात हे ठिकण एक्सप्लोर करण्यासाठी उत्तम आहे. तसेच हे गाव लाकडी घरे आणि मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. शहराच्या गर्दीपासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या या गावाचे दृश्य एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही. चार उंच डोंगर, हिरवळ आणि निसर्गाचे सुंदर दृश्य पाहून तुम्हाला शांतता वाटेल