नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा प्लान करताय? या 5 हिल स्टेशनशिवाय कुठंच जाऊ नका; जाळ अन् धूर संगाटच!
भारतातील पाच आकर्षक हिल स्टेशनमध्ये नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. मनाली, दार्जिलिंग, शिमला, औली आणि नैनीताल ही ठिकाणे नैसर्गिक सौंदर्याने नटलेली असून, अनेक साहसी खेळ आणि मनोरंजन उपलब्ध आहे. या ठिकाणी होणाऱ्या उत्सवांचा आनंद घेण्यासाठी अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स विशेष पॅकेजेस देतात. तुमच्या आवडीप्रमाणे एक उत्तम हिल स्टेशन निवडा आणि नवीन वर्षाचा आनंद घ्या!
New Year Celebration At Hill Station : जुन्या वर्षाला निरोप देण्याचं काऊंडाऊन सुरू झालं आहे. नवीन वर्षाच्या तयारीसाठी अनेकांनी मस्त प्लान आखले आहेत. काही लोक तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कुठे तरी बाहेर फिरायला जाण्याचा प्लान करत आहेत. तुम्हीही जर नवीन वर्षानिमित्ताने कुठे बाहेर फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर भारतातील पाच टॉप हिल स्टेशनला नक्की जा. या ठिकाणी गेल्यावर पैसे सार्थकी लागल्याचं दिसून येईल. जीवनात नवीन झळाळी आल्याचं भासेल.
भारतातील काही प्रमुख हिल स्टेशन नवीन वर्षाचा जल्लोष करण्यासाठी अत्यंत भारी आहेत. या हिल स्टेशनातील शांत वातावरण, अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य आणि अंगाला झोंबणारा वारा यामुळे कोणत्याही पर्यटकाला ही ठिकाणे सोडावीशी वाटत नाहीत. या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंग, साहस आणि विविध संस्कृतीचा आनंद घेऊ शकता. आयुष्यात एकदा तरी भेट दिलीच पाहिजे अशा भारतातील या पाच हिल स्टेशनची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
मनाली (Manali), हिमाचल प्रदेश
का जावं? –
मनाली केवळ सुंदर डोंगराळ रांगांसाठी प्रसिद्ध नाहीये. तर अॅव्हेंचर स्पोर्ट्ससाठीही प्रसिद्ध आहे. स्कीइंग, पॅराग्लाइडिंग आणि ट्रेकिंगही तुम्ही करू शकता. बर्फाळ डोंगरात फिरणं हा अद्भूत क्षण असतो. जणू काही स्वर्गातच आल्याचा भास होतो.
विशेष आकर्षण :
सोलंग व्हॅली, रोहतांग पास, हिडिम्बा मंदिर आणि ब्यास नदीचा किनारा पाहण्यासारखा आहे.
नव्या वर्षाची पार्टी :
मनालीत अनेक हॉटेल आणि रिसॉर्ट्समध्ये नव्या वर्षाच्या स्वागताचं खास आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्ही दोस्त आणि कुटुंबासोबत या ठिकाणी येऊ शकता.
दार्जिलिंग (Darjeeling), पश्चिम बंगाल
का जावं? :
दार्जिलिंगचं वातावरण अत्यंत शांत आहे. या ठिकाणचं दृश्य अद्भूत आहे. त्यामुळे नवीन वर्षाचं सेलिब्रेशन अत्यंत उत्साही होतं. येथील “टॉय ट्रेन”चा प्रवास आणि माउंट कंचनजंगा या भव्य पर्वताच्या दृश्यांनी आपले मन प्रफुल्लित होईल.
विशेष आकर्षण :
बत्तलमाता, टॉय ट्रेन, टायगर हिल आणि चहांच्या मळ्यांचं दर्शन घेऊ शकता.
नवीन वर्षाची पार्टी :
दार्जिलिंगमधील अनेक रिसॉर्ट्स आणि कॅफे नवीन वर्षाच्या रात्री विशेष कार्यक्रम आयोजित करतात, लाइव्ह संगीत, नृत्य आणि शानदार डिनरची या हॉटेलांमध्ये रेलचेल असते.
शिमला (Shimla), हिमाचल प्रदेश
शिमलाचे थंड वातावरण, सुंदर डोंगराळ दृश्ये आणि ऐतिहासिक महत्त्व यामुळे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी एक उत्तम ठिकाण ठरते.
विशेष आकर्षण :
रिज मैदान, मॉल रोड, कुफरी आणि समर हिल्स येथे जाऊ शकता.
नवीन वर्षाची पार्टी :
शिमला मध्ये विशेषतः मल्टी-स्पेशलिटी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करतात. या ठिकाणी लाइव्ह संगीत आणि डान्स शोचं आयोजन केलं जातं.
औली (Auli), उत्तराखंड
औली उत्तराखंडमधील एक आश्चर्यकारक हिल स्टेशन आहे. हे ठिकाण स्कीइंग आणि बर्फाळ पर्वतांसाठी ओळखले जाते. हे ठिकाण शांत आणि रोमँटिक वातावरण असलेले आहे. त्यामुळे कपल्सने तर यावंच असं हे ठिकाण आहे.
विशेष आकर्षण :
औलीमध्ये स्कीइंग, ट्रेकिंग आणि केबल कार राइडिंगचा अनुभव घेता येतो.
नवीन वर्षाची पार्टी :
या ठिकाणचे रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स नवीन वर्षाच्या निमित्ताने विशेष पॅकेजेस देतात.
नैनीताल (Nainital), उत्तराखंड
नैनीताल एक सुंदर तलावाच्या काठावर वसलेले हिल स्टेशन आहे. येथील तलावाच्या शांत वातावरणात नवीन वर्षाचा उत्सव साजरा करू शकता. नैनीतालच्या कुमाऊं क्षेत्रातील अनेक रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स नवीन वर्षाच्या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करतात.
विशेष आकर्षण :
नैनी तलाव, नैना देवी मंदिर आणि स्नो व्ह्यू पॉइंट पाहण्यासारखे आहेत.
नवीन वर्षाची पार्टी :
मोठ्या हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स जबरदस्त डिनर आणि डान्स पार्टीचं आयोजन करतात. त्यामुळे या ठिकाणी यायला लोक उत्सुक असतात.