कार, बस किंवा ट्रेनमध्ये झोप का येते?; तुम्हालाही माहीत नसतील ही कारणे
प्रवासादरम्यान झोप येण्यामागे अनेक कारणे आहेत. प्रवासापूर्वीचा थकवा, वाहनांची हालचाल, बंद खिडक्यांमुळे कमी होणारा नैसर्गिक प्रकाश, शरीरातील शारीरिक बदल (रक्तदाब कमी होणे, शरीराचे तापमान कमी होणे) आणि प्रवासादरम्यान मानसिक सक्रियतेचा अभाव ही त्यातील प्रमुख कारणे आहेत. प्रवासात झोप टाळण्यासाठी पुरेशी झोप घेणे, हलका नाश्ता करणे, गाणे ऐकणे, वाचन करणे किंवा बोलणे, काचा उघडणे आणि कॅफीनचा मर्यादित वापर या उपायांचा वापर करता येतो.
Sleepiness While Traveling : गाडी किंवा ट्रेनमध्ये प्रवास करताना अनेकदा आपल्याला गाढ झोप लागते. प्रवासादरम्यान बाहेरच्या वाहनांचा आवाज येत असताना सुद्धा आपल्याला झोप लागते. पण एवढ्या आवाजात सुद्धा आपल्याला झोप का येते? याचा कधी तुम्ही विचार केलाय का? तुम्हाला रात्री चांगली झोप लागली असली तरी प्रवास करताना तुमचे डोळे जड वाटू लागतात. विशेषतः जेव्हा प्रवास लांबचा असतो. चला तर मग जाणून घेऊया या मागचं नेमकं कारण काय आहे.
प्रवासात झोप का येते?
प्रवास करण्याआधी काही लोकं आधीच थकलेले असतात, त्यातच झोप अपूर्ण असते त्यामुळे प्रवासादरम्यान अधिक सहजपणे झोप येऊ शकते. कारच्या आत, वातावरण कसेही असले तरी झोपायला अनुकूल आहे, त्यामुळे शरीर विश्रांती घेण्याच्या कोणत्याही संधीचा फायदा घेते, विशेषतः शांत वातावरणात.
प्रवासात गाडी वेगाने रस्त्यावर धावत असते त्यामुळे वाहन सतत हलत असते. त्यामुळे गाडीत बसलेली व्यक्ती सुद्धा हळुवारपणे हलत असते. त्याचा परिणाम प्रवास करणाऱ्याला झोप येते. प्रवासात गाडीतील खिडक्यांच्या काचा या बंद असतात. तसेच गाडी अधिक वेगात असल्यावर आपल्या डोळयांना बाहेरच्या गोष्टी या फारश्या काही नीट दिसत नाही त्यामुळे आपल्या मेंदूची सजगता कमी होते आणि आपल्याला झोप येऊ लागते.
कार किंवा ट्रेनच्या खिडक्या बंद असतात. या वातावरणात नैसर्गिक प्रकाश फारच कमी असतो आणि फक्त वाहनाच्या आत असलेला प्रकाश पुरेसा असतो. अशा परिस्थितीत, बऱ्याच वेळा आपली सर्केडियन लय बिघडते आणि मेंदूला असे वाटते की झोपण्याची वेळ झाली आहे. त्यामुळे तुम्हाला झोप येऊ शकते. प्रवासादरम्यान शरीरात होणारे काही शारीरिक बदल जसे की कमी रक्तदाब, शरीराचे तापमान कमी होणे इत्यादींमुळेही झोप येऊ शकते. प्रवासादरम्यान वाचन काम किंवा बोलणे यासारख्या गोष्टींच्या अभावामुळे सुद्धा तुम्हाला झोप येऊ शकते. लांबच्या प्रवासात हे अनेकदा घडते.
प्रवासात झोप येणे कसे टाळावे?
– प्रवासाला जाण्यापूर्वी चांगली झोप घेण्याचा प्रयत्न करा.
– हलका नाश्ता केल्याने तुमची ऊर्जा पातळी कायम राहील.
– तुमच्या प्रवासादरम्यान एखादे सुंदर गाणे ऐका, पुस्तके वाचा किंवा आपल्या सोबतच्या लोकांशी बोला.
– शक्य असल्यास, गाडीच्या काचा उघडून नैसर्गिक प्रकाश मिळवण्याचा प्रयत्न करा.
– जर तुम्ही खूप थकलेले असाल तर तुम्ही कॅफीनयुक्त पदार्थांचा कमी प्रमाणात सेवन करा. कारण याने तुम्हाला झोप येणार नाही.