इन्स्टंट ग्लो हवा असेल तर ट्राय करा हे होममेड फेसपॅक !
चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या पण इन्स्टंट चमक हवी असेल तर घरच्या घरी बनवलेल्या काही फेसपॅकचा नियमित वापर करणे उपयुक्त ठरू शकते. ते कसे बनवायचे हे जाणून घेऊया.

Instant Glow Homemade Face Packs : सुंदर आणि चमकदार त्वचा मिळावी (glowing skin) असं प्रत्येकालाच वाटतं. त्यासाठी लोक त्वचेवर विविध स्किन केअर आणि ब्युटी प्रॉडक्ट्सचा (beauty products) वापर करत असतात. मात्र हे सर्व उपाय करूनही कधीकधी मनाजोगता रिझल्ट मिळत नाही. चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी महिला कोणत्याही समारंभापूर्वी फेशिअल करून घेतात. पण अनेकवेळा अचानक एखादा समारंभ किंवा पार्टी असेल तर काय करायचं असा प्रश्न बऱ्याच जणींना पडतो.
पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या पदार्थांच्या मदतीने फेस पॅक बनवू शकता आणि त्यांचा वापर करू शकता. यामुळे तुमची त्वचा ताजी आणि चमकदार दिसेल.
पपई आणि दुधाचा फेसपॅक
पपई आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी फायदेशीर आहे. ती त्वचा एक्सफोलिएट करते आणि डेड स्किन आणि चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकते. पपईच्या वापराने पिंपल्स, पिगमेंटेशन, सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर होण्यास मदत होते. त्वचेचा पोच सुधारण्यासाठीही पपई खूप प्रभावी ठरते. चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी तुम्ही पपई आणि दुधाचा फेस पॅक लावू शकता. यासाठी एका भांड्यात २ चमचे पपईचा गर घेऊन त्यात २-३ चमचे कच्चे दूध घाला. हे मिश्रण नीट एकजीव करा व चेहऱ्याला लावा. 10-15 मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवा.
बेसन आणि दही
त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी बेसनाचा वापर शतकानुशतके केला जात आहे. आपली आई, आजी या देखील त्वचेसाठी नेहमी बेसन वापरत असत. बेसन हे त्वचेवरील मळ आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते. तसेच त्यामुळे टॅनिंगपासूनही मुक्ती मिळू शकते. बेसन आणि दह्याचा फेसपॅक लावल्यास त्वचेचा रंग, पोत सुधारतो आणि त्वचा चमकदार होते. हा फेसपॅक तयार करण्यासाठी एका भांड्यात 2 चमचे बेसन घ्या. त्यात एक चमचा दही आणि चिमूटभर हळद घाला. या सर्व गोष्टी नीट मिसळून चेहऱ्यावर हलक्या हाताने लावाव्यात. वाळल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. नियमित वापराने फरक दिसून येईल.
चंदन पावडर आणि गुलाबपाणी
इन्स्टंट ग्लो आणि ताजेपणासाठी तुम्ही चंदन पावडर आणि गुलाबपाण्याचा फेस पॅक लावू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये २ चमचे चंदन पावडर घ्या. त्यात गुलाबजल टाकून जाडसर पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर सर्वत्र नीट लावा आणि वाळू द्या. 10-15 हा पॅक वाळल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. चंदन पावडर आणि गुलाबपाण्यामुळे त्वचा खूप मऊ आणि चमकदार दिसेल.
कॉफी आणि मधाचा फेसपॅक
कॉफी प्यायल्याने आपल्याला ताजंतवानं, फ्रेश वाटतं. पण हीच कॉफी चेहऱ्यासाठीही फायदेशीर असते, हे तुम्हाला माहीत आहे का ? इन्स्टंट चमक हवी असेल तर तुम्ही कॉफी आणि त्यासह मधाचा फेसपॅक तयार करून तो वापरू शकता. कॉफी ही नैसर्गिक एक्सफोलिएंट म्हणून काम करते. तसेच ती मृत त्वचा काढून टाकण्यासोबतच टॅनिंग आणि पिगमेंटेशन दूर करण्यास मदत करते. तर मध त्वचेचे पोषण करते आणि मधाच्या वापरामुळे त्वता चमकदार आणि मऊ होते. हा फेसपॅक बनवण्यासाठी एका भांड्यात 2 चमचे कॉफी पावडर घ्या. त्यात २ चमचे मध आणि एक चमचा कच्चे दूध घालून चांगले मिसळा. आता ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. सुमारे 15 मिनिटांनंतर, चेहऱ्याला नीट मसाज करा आणि थोड्या वेळाने पाण्याने धुवून टाका.