बारमध्ये प्रत्येक ड्रिंकसाठी वेगळा ग्लास का असतो? फॅन्सी स्टाईल नाही, यामागे आहे एक खास कारण!
बारमध्ये गेल्यावर वाईन, व्हिस्की, कॉकटेलसाठी ते वेगवेगळे ग्लास का देतात, हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? हे फक्त फॅन्सी दिसण्यासाठी आहे, असं वाटतं? पण यामागे आहे प्रत्येक पेयाचा आत्मा जपण्याचं एक खास लॉजिक आणि शिष्टाचार! चला, जाणून घेऊया या ग्लासेसमागचं गुपित, जे तुमचा पुढचा ड्रिंक ऑर्डर करण्याचा अनुभव नक्कीच बदलेल!

कधी बारमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तुमचंही लक्ष गेलं असेल की प्रत्येक ड्रिंकसाठी वेगवेगळा ग्लास असतो! वाईन, व्हिस्की, शॅम्पेन, कॉकटेल्स सगळ्यांसाठी वेगवेगळ्या स्टाईलचे ग्लास असतात. पण, हे फक्त शोभेसाठी किंवा फॅन्सीपणासाठी नाही, तर यामागे एक वैज्ञानिक लॉजिक आहे. चला, आज बघूया या ग्लासेसचं उपयोग का आणि कसा केला जातो!
1. वाईन ग्लास: वाईन पिताना नेहमी लांब दांडी असलेला ग्लास दिला जातो. दांडीला पकडल्यावर आपल्या हाताच्या उष्णतेचा परिणाम वाईनच्या तापमानावर होत नाही, त्यामुळे वाईनचा स्वाद आणि थंडावा तसाच राहतो.
रेड वाईनसाठी मोठा आणि थोडासा पसरट ग्लास वापरतात, जेणेकरून सुगंध नीटपणे नाकात पोहचतो.
व्हाईट वाईनसाठी थोडा लहान आणि कमी पसरट ग्लास असतो, कारण ती थंड राहणं महत्त्वाचं असतं.
2. शॅम्पेन ग्लास : शॅम्पेन आणि स्पार्कलिंग वाईनसाठी एक लांबट, निमुळता ग्लास वापरला जातो, याला ‘फ्लूट ग्लास’ म्हणतात. यामुळे शॅम्पेनमधले बुडबुडे जास्त वेळ टिकतात आणि प्रत्येक घोटात फ्रेशनेस जाणवतो.
3. व्हिस्की ग्लास : पिण्याच्या पद्धतीनुसार हे ग्लास दोन वेगवेगळ्या पद्धतीमध्ये असतात.
ओल्ड फॅशन्ड ग्लास : हा ग्लास जाडसर आणि पसरट असतो. यात बर्फाचे तुकडे टाकून व्हिस्की ‘ऑन द रॉक्स’ पितात.
स्निफ्टर ग्लास : फुगीर खालचा भाग आणि निमुळते तोंड असलेला हा ग्लास ब्रँडी, रम किंवा neat व्हिस्की पिण्यासाठी वापरला जातो. हाताने ग्लास हलक्या उष्णतेने धरल्यावर पेयाचा सुगंध अधिक खुलतो.
4. शॉट ग्लास: लहान ग्लास, एका घोटात संपवायचं ड्रिंक जसं की टकीला, वोडका यासाठी वापरतात.
5. बीअरचे ग्लास : बीअर सर्व्ह करताना मग किंवा पिंट ग्लास वापरतात. मगला हँडल असतो, तर पिंट ग्लास थेट हातात धरला जातो.
तर यापुढे बारमध्ये गेल्यावर ग्लासच्या प्रकारांमागचं हे लॉजिक नक्की लक्षात ठेवा!