हिवाळ्यात केसांना मेहंदी का लावू नये? जाणून घ्या कारणे
मेहंदी केसांना नैसर्गिक रित्या कंडिशनिंग करते. मेहंदी लावल्याने केसांना अनेक फायदे होतात पण हिवाळ्यात मेहंदी लावणे शक्यतो टाळले पाहिजे. हिवाळ्यात मेहंदी का लावायची नाही जाणून घ्या त्याची कारणे.
हिवाळा ऋतू केसांसाठी अनेक आव्हाने घेऊन येतो. थंड आणि कोरड्या वाऱ्यामुळे केस कोरडे, निर्जीव आणि कमकुवत होतात. यावेळी केसांची काळजी घेण्यासाठी आपण नैसर्गिक गोष्टींची मदत घेतो. मेहंदी हा केसांसाठी उत्कृष्ट नैसर्गिक कंडिशनर आणि रंग मानला जातो. स्त्रिया आणि पुरुष दोघेही त्यांचे पांढरे केस लपवण्यासाठी किंवा केसांना अतिरिक्त रंग देण्यासाठी मेहंदीचा वापर करतात. मेहंदी पूर्णपणे नैसर्गिक आहे म्हणून ती लावल्याने त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाही.
हिवाळ्यामध्ये मेहंदी लावायची की नाही हा संभ्रम अनेकदा लोकांना असतो. हिवाळ्यात केसांसाठी मेहंदी खरच चांगली नसते का? जर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर शोधत असाल तर जाणून घ्या हिवाळ्यात मेहंदी लावायची असेल तर कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि हिवाळ्यात का मेहंदी लावू नये ते.
हिवाळ्यात मेहंदी न लावण्याची कारणे
केस जास्त कोरडे होतात: हिवाळ्यात केस आधीच कोरडे आणि निर्जीव झालेले असतात. मेहंदीमध्ये कुलिंग इफेक्ट असतो आणि तो केसांमधील ओलावा शोषून घेतो. त्यामुळे केस मेहंदी लावल्यानंतर अधिक कोरेडे होण्याची शक्यता असते.
सर्दी होऊ शकते: मेहंदी ही मुळातच थंड असते ती लावल्याने डोक्यात आणि शरीरात थंडावा वाटतो. तो हिवाळ्यात आरोग्यासाठी हानिकारक ठरवू शकतो. मेहंदी लावल्यानंतर तुम्हाला सर्दी खोकल्यासारखे सामान्य आजार होण्याची शक्यता असते.
टाळू कोरडा होऊ शकतो: हिवाळ्यात टाळू आधीच कोरडा झालेला असतो. मेहंदी लावल्याने तो अधिक कोरडा होऊ शकतो. ज्यामुळे कोंड्याची समस्या वाढते. त्यामुळे हिवाळ्यात मेहंदी लावणे शक्यतो टाळा.
केस गळण्याची समस्या: थंड वारा आणि कोरडेपणा यामुळे हिवाळ्यात केस अधिक गळतात. मेहंदी मुळे केस थोडे कडक होतात ज्यामुळे ते तुटण्याची शक्यता वाटते.
हिवाळ्यात मेहंदी लावायची असल्यास आवश्यक टिप्स
मेहंदी मध्ये मॉइश्चरायझिंग एजंट्स टाका: मेहंदी थंड हवामानात केस कोरडे करू शकते. हे टाळण्यासाठी मेहंदी लावताना त्यामध्ये दही, मध किंवा खोबरेल तेल टाका.
कोमट पाण्याचा वापर करा: मेहंदीची पेस्ट बनवण्यासाठी थंड पाणी वापरण्या ऐवजी कोमट पाणी वापरा. यामुळे मेहंदी केसांना चांगली लागते आणि सर्दी होण्याचा धोकाही टळतो.
जास्त वेळ मेहंदी लावून ठेवू नका: हिवाळ्यात केसांना दीड ते दोन तासापेक्षा जास्त काळ मेहंदी लावू नका. जास्त वेळ मेहंदी ठेवल्याने केस कोरडे होऊ शकतात. याशिवाय सर्दी होण्याचा धोकाही असतो.
केस धुतल्यानंतर केसांना तेल लावा: मेहंदी लावल्यानंतर जेव्हा तुम्ही केस धुता त्यानंतर टाळूला हलक्या हाताने तेलाने मालिश करा. यामुळे केसांमधील आद्रता टिकून राहण्यास मदत होईल.