टॅनिंग मुळे त्वचा पडली काळी ? किचनमधील या गोष्टींचा वापर करून तर पहा
त्वचेवरील टॅनिंग काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय केले जाऊ शकतात. या उपायाने हात आणि पायांच्या मृत त्वचेच्या पेशी काढून टाकल्या जातात आणि त्वचा चमकदार दिसते.
हिवाळा असो किंवा उन्हाळा असो हात आणि पाय हे टॅन होतात. उन्हाळ्यात उन्हात थोडा वेळ जरी गेले तरी त्वचेवर टॅनिंग दिसून येते. तर हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक जण उन्हात जातात परंतु त्यामुळे ही टॅनिंग होते. हात पाय टॅन झाले की काळेपणा दिसायला लागतो. यामुळे त्वचेवर मळाचा थर साचल्यासारखे वाटते आणि त्वचेवर मृत पेशी दिसतात. एखाद्या व्यक्तीला वाटते की ही व्यक्ती हात आणि पाय स्वच्छ ठेवत नाही. जर तुम्हालाही हात आणि पायांचे टॅनिंग दूर करायचे असेल तर काही घरगुती उपाय जाणून घेऊ.
कॉफी आणि खोबरेल तेल
एका वाटीमध्ये कॉफी आणि त्यात थोडेसे खोबरेल तेल टाका. हे व्यवस्थित मिक्स करून हात पायांवर लावून थोड्यावेळ हलक्या हाताने मसाज करा आणि पंधरा ते वीस मिनिटानंतर धुऊन घ्या. यामुळे टॅनिंग कमी होते आणि त्वचा स्वच्छ दिसते. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता.
बेसन पीठ आणि दही
बेसन पीठ आणि दही यांचाही त्वचेवर चांगला परिणाम होतो. टॅनिंग पासून मुक्तता मिळवण्यासाठी बेसन पीठ आणि दह्याचे मिश्रण अत्यंत फायदेशीर ठरते. यासाठी एका वाटीमध्ये दही आणि बेसन पीठ घ्या हे व्यवस्थित मिक्स करून टॅनिंग आहे त्या भागावर लावा आणि अर्धा तासानंतर धुऊन घ्या.
बटाटा आणि लिंबाचा रस
लिंबाचा रस बटाट्याचा रसात मिसळून टॅनिंग झालेल्या भागावर लावा. हे मिश्रण ब्लिचिंग गुणधर्माने समृद्ध आहे आणि काळे डाग तसेच टॅनिंग कमी करण्यासाठी प्रभावी आहे. बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस समप्रमाणात एका वाटीमध्ये घ्या. हे मिश्रण कापसाच्या मदतीने टॅन झालेल्या भागावर लावा आणि वीस ते तीस मिनिटानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. यामुळे त्वचेला व्हिटॅमिन सी चे फायदे देखील मिळतात.
चंदन आणि मध
चंदन आणि मधाचा पॅक हात आणि पायांसोबतच चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकतो. हा पॅक बनवण्यासाठी पाच ते सहा चमचे चंदन पावडर, तीन ते चार चमचे मध आणि थोडेसे पाणी घालून ही पेस्ट तयार करा. ही पेस्ट हात आणि पायांवर लावून वीस मिनिटे ठेवा आणि नंतर धुऊन घ्या. यामुळे त्वचा हायड्रेट होते आणि टॅनिंगही कमी होऊ लागते.
हळद आणि दही
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद त्वचेवरील डाग आणि टॅनिग दूर करण्यासाठी वापरली जाते. एका भांड्यात दही घेऊन त्यामध्ये एक ते दीड चमचा हळद मिसळा. हे व्यवस्थित मिक्स करून हे मिश्रण टॅनिंग झालेल्या भागावर लावा आणि 25 ते 30 मिनिटानंतर स्वच्छ धुवा. यामुळे त्वचा उजळ होऊन स्वच्छ दिसते टॅनिंग कमी करण्यासाठी तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता.