काय म्हणतात, आता गाढवांनाही महत्व आले, चोरट्यांनी चोरली १२ गाढवे
सोने-चांदी दगिने व रुपये यांची चोरी नेहमीच होत असते. भुरटे चोर मग शेतकऱ्यांच्या शेतातील पाईप, वायरी चोरुन नेतात. काही वेळा गायी, म्हैशींची चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
कोपरगाव, नगर : चोरीच्या वेगवेगळ्या घटना आपण पहिल्या असतील, वाचल्या असतील. सोने-चांदी दगिने व रुपये यांची चोरी नेहमीच होत असते. भुरटे चोर मग शेतकऱ्यांच्या शेतातील पाईप, वायरी चोरुन नेतात. काही वेळा गायी, म्हैशींची चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु तुम्हाला जर सांगितले की गाढवांची चोरी झाली आहे तर…तुमचा विश्वास बसणार नाही. होय चक्क एक-दोन नव्हे बारा गाढवांची चोरी झाली आहे. मग या गाढवांच्या चोरीचा (Stealing Donkey ) गुन्हा पोलिसांत (police) दाखल झाला आहे. आता पोलिसांना आपल्या इतर कामांबरोबर गाढवांचा चोर शोधावा लागणार आहे.
नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात चोरीची एक अजब घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथे अजब गजब चोरीची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी राहत्या घराच्या समोरील पटांगनातून चक्क १२ गाढवांची चोरी केली आहे. लक्ष्मण किसन कापसे यांच्या मालकीची ही गाढवे होती.
पोलिसांत गुन्हा दाखल
धारणगाव येथील रहिवाशी असलेले लक्ष्मण किसन कापसे यांचा पारंपरिक माती व्यवसाय आहे. ते माती वाहण्यासाठी गाढवांचा वापर करतात. ३ फेब्रुवारी रोजी रात्री त्यांनी आपले १४ लहान मोठे गाढव घरासमोर बांधून ठेवले होते. ३ ते ४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांची १२ गाढव लंपास केली.
या गाढवांची किमत सुमारे ८५ हजार आहे. मग लक्ष्मण कापसे यांनी परिसरात गाढवांचा शोध घेतला. परंतु गाढवे मिळाली नाही. यामुळे अखेरी त्यांनी तालुका पोलिसांत गाढव चोराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक आंधळे करीत आहे.
माती वाहण्यासाठी उपयोगी
गाढवाचा उपयोग माती वाहण्यासाठी केला जातो. यामुळे कुंभारांकडे गाढव असते. आता उन्हाळा येणार आहे. यामुळे कामाचा हंगाम सुरू होणार आहे. या परिस्थितीत दिमतीला असणारी गाढवं चोरीली गेली तर गरीब कुटुंब हवालदिल होतात. आधीच हातावर पोट असलेली ही माणसं आता कर्जाच्या नव्या ओझ्यामुळे पुरती वाकली जातायत.