Nashik| नाशिक विभागातील 170 आश्रमशाळा तब्बल 2 वर्षांनी सुरू; पालकांचे संमतीपत्र बंधनकारक
शाळा सुरू झाल्यावर सर्वांनी एन 95 मास्क लावणे बंधनकारक आहे, अशा सूचनाही आदिवासी आयुक्तालयाने दिल्या आहेत.
नाशिकः नाशिक विभागीतल तब्बल 170 आश्रमशाळा अखेर 2 वर्षांनी सुरू झाल्या आहेत. आदिवासी विकास विभागाच्या 14 डिसेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रात ‘चला मुलांनो शाळेत चला’ ही सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत सर्व आश्रमशाळेतील इयत्ता 1 ली ते 4 थी चे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. पहिल्याच दिवशी या विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. सर्व कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळून या आश्रमशाळा पूर्ण क्षमतेने सुरू राहतील, अशी माहिती आदिवासी विकास आयुक्तालयाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी दिली आहे.
संमतीपत्र बंधनकारक
मुलांनी शाळेत यावे यासाठी ‘चला मुलांनो शाळेत चला’ ही मोहिम सर्वच आश्रमशाळांमध्ये सुरू करण्यात आली आहे. आश्रमशाळा निवासी असतात. विद्यार्थी शाळेतच राहत असतात. यामुळे आपल्या मुलाला शाळेत किंवा वसतिगृहात पाठवण्यापूर्वी पालकांचे संमतीपत्र सर्वच आश्रमशाळा व वसतिगृह यांना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्रामीण स्तरावर ज्या गावात मागील एक महिन्यात एकही कोविड रूग्ण आढळून आला नाही, अशा ठिकाणी पालकांशी चर्चा करून या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी लसीकरणाचा किमान पहिला डोस घेतलेला असावा. दुसरा डोस त्वरित घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
शाळांना सूचना
कोरानाच्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळांमध्ये भोजनव्यवस्था, निवासव्यवस्था तसेच योग्य ते शारीरिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. यासाठी आदिवासी विकास मंत्री अॅड. के.सी. पाडवी, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास विभागाने शाळा आणि वसतिगृहे सुरू करण्यापूर्वी व सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत.
एन 95 मास्क बंधनकारक
शाळा आणि शाळेतील वसतिगृह सुरू करण्यापुर्वीच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संपूर्ण आश्रमशाळेचा तसेच वसतिगृह यांचा परिसर स्वच्छ आणि निर्जंतुक करावा. गर्दी होणार नाही यादृष्टीने विविध समित्या गठीत करून त्यांचे कार्य ठरवावे. विद्यार्थ्यांची वर्गातील बैठक व्यवस्था तसेच निवासव्यवस्था यांचे योग्य नियोजन करणे, शारीरिक अंतर राखणे याबाबतच्या खुणा, चिन्हे आश्रमशाळेत व वर्गात लावणे आणि शाळा सुरू झाल्यावर सर्वांनी एन 95 मास्क लावणे बंधनकारक आहे, अशा सूचनाही आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी दिल्या आहेत.
आश्रमशाळा आणि वसतिगृहे सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची स्वच्छता आणि सुरक्षितता ठेवणे, शालेय वेळापत्रक बनवणे, भोजनवेळेचे नियोजन करणे , विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित शारीरिक अंतराचे पालन करणे तसेच संशयित किंवा कोविडबाधित आढळल्यास योग्य ती दक्षता घेणे या बाबत देखील सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षक, अधिक्षक-अधिक्षिका आणि गृहपाल यांच्यावर असणार आहे. – हिरालाल सोनवणे, आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय
इतर बातम्याः