Manoj Jarange Patil : 24 तारीख मराठा बांधवांसाठी महत्त्वाची, जरांगे पाटलांनी केली मोठी घोषणा
मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेसाठी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला असून आता त्यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे.
यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये चूरस वाढण्याची शक्यता आहे. ही निवडणूक जरी महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी होणार असली तरी देखील मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील या निवडणुकीमध्ये उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. ज्या मतदारसंघात आपले उमेदवार निवडून येतील तिथे उमेदवार उभे करू आणि जिथे निवडून येण्याची शक्यता कमी आहे, अशा मतदारसंघात जो उमेदवार मराठा आरक्षणाला पाठिंबा देईल त्याच्या पाठिशी उभे राहू अशी भूमिका जरांगे पाटील यांनी रविवारी झालेल्या बैठकीमध्ये मांडली. दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी बैठकीबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
या अगोदर आम्ही महाराष्ट्रातील इच्छुकांची बैठक घेतली होती, ती निवडणूक लढाईची की पाडायचे यासाठी होती. त्यावेळी आम्ही सांगितलं होतं, एका मतदारसंघात एकच उमेदवार द्या, तुमच्या मतदारसंघात तुमच्या बैठका घ्या. येत्या 24 तारखेला अंतरवाली सराटीमध्ये जिल्ह्यानुसार बैठक घेऊन मी स्वत: बसून एक उमेदवार देण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यांनी फॉर्म भरले तर ते किचकट होईल. एका मतदार संघातून एक उमेदवार दिला तर ताकत लावता येईल. आपण त्या मतदार संघात एक फॉर्म ठेऊ आणि बाकीचे काढून घेऊ असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले ज्यांना फॉर्म काढून घ्यायला सांगण्यात येईल त्यांनी फॉर्म काढून घ्यावा, जर एखाद्या मतदारसंघात सांगूनही फॉर्म ठेवला तर त्याने मुद्दाम फॉर्म ठेवला आणि मॅनेज झाला, त्याला मराठ्यांशी काही देणे -घेणे नाही असं माणण्यात येईल. मी आज आणि उद्या कोणते उमेदवार द्यायचे याची यादी करत आहे, पण डिक्लेअर करणार नाही. माझी विनंती आहे की येत्या 23 तारखेपर्यंत इच्छुकांशिवाय मला कोणीही भेटायला येऊ नका असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.