Nashik | नाशिककरांनो, कोणती प्लास्टीक पिशवी वापरताय; अन्यथा होऊ शकतो 25 हजारांचा दंड, 3 महिने जेलही
नाशिकमध्ये दोन वर्षांपासून बासनात गुंडाळलेली प्लास्टीक बंदी मोहीम पुन्हा एकदा काही दिवस तरी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नाशिकः नाशिककरांनो, तुम्ही नेमकी कुठली प्लास्टीकची पिशवी वापरताय. असे अचानक विचारायचे कारण म्हणजे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी काढलेली अधिसूचना. कारण त्यांनी आता केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने ऑगस्ट महिन्यात सुधारित प्लास्टीक कचरा व्यवस्थापन नियम 2021 नुसार केलेल्या कायद्याची अंमलबजावणी सुरू केलीय. त्यामुळे दोन वर्षांपासून बासनात गुंडाळलेली प्लास्टीक बंदी मोहीम पुन्हा एकदा काही दिवस तरी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कशी असेल मोहीम?
टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबण्यात येणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्यावर बंदी असेल. दुसऱ्या टप्प्यात 30 सप्टेंबर 2021 पासून 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीकच्या पिशव्यावर बंदी आहे. सोबतच इतर प्लास्टीक वस्तूवरही बंदी घालण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2022 पासून 120 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या सर्व प्रकारच्या प्लास्टीक पिशव्या आणि वस्तूंवर बंदी राहणार आहे. तरीही यांचा वापर होत राहिल, तर दंड ठोठावण्यात येणार आहे.
काय होणार दंड?
गुन्ह्याचे स्वरूप आणि त्यानुसार दंड निश्चित करण्यात आला आहे. पहिला गुन्हा करणाऱ्यास 5000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा गुन्हा करणाऱ्यास 10000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे आणि जर तिसऱ्यांदा पुन्हा प्लास्टीक बंदीचा नियमांचे उल्लंघन करून गुन्हा केलाच तर त्या व्यक्तीला थेट 25000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. इतकेच नव्हे, तर त्या व्यक्तीला 3 महिने तुरुंगाची हवाही खावी लागू शकते. हा दंड जर होऊ नये असे वाटत असेल, तर नक्कीच नियमांचे पालन करा. शिवाय सध्या हवामान बदलाचे तडाखे आपण सहन करतच आहोत. सरकारने केलेल्या नियमांचे पालन केले, तर प्रदूषण कमी होईल.
प्लास्टीकच्या या वस्तूंवर बंदी
मिठाई बॉक्स, थर्मोकोल, सजावटीचे प्लास्टीक, सिगारेट पाकिटे, आमंत्रण कार्ड, प्लास्टीक काड्यांची कानकोरणी, फुग्यांच्या प्लास्टीक काड्या, आईस्क्रीम कांड्या, प्लास्टीकचे झेंडे, कटलरी साहित्य, ग्लासेस, प्लेट्स कप, 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टीक किंवा पीव्हीसी बॅनर, सर्व प्रकारच्या प्लास्टीकच्या पिशव्या, डबे, बाऊल या वस्तू तुम्ही रोजच्या व्यवहारात वापरू नका. अन्यथा महापालिकेचे पथक येऊन धडकले, तर तुम्हालाही कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
इतर बातम्याः
नाशिक जिल्ह्यात 6 नगरपंचायतीसाठी 402 अर्ज; देवळा येथे 4, निफाड 3, कळवणला 2 प्रभागांमधील निवडणूक रद्द