कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींसह चौघी बुडाल्या, तिघींचा अंत
कपडे धुण्यासाठी गेलेल्या चौघी जणी नदीत बुडाल्या. यापैकी तिघींचा मृत्यू झाला आहे, तर एकीला वाचवण्यात यश आलं.
महेंद्रकुमार मुधोळकर, बीड: कपडे धुण्यासाठी गेलेल्या चौघी जणी नदीत बुडाल्या. यापैकी तिघींचा मृत्यू झाला आहे, तर एकीला वाचवण्यात यश आलं. बीड जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. मृतांमध्ये आई, मुलगी आणि पुतणीचा समावेश आहे. गेवराई तालुक्यातील मिरगाव इथं ही दुर्दैवी घटना घडली. (4 women drowned in the river 3 died at Gevrai Beed Maharashtra )
रंजना गोडबोले वय 30, शीतल गोडबोले वय 10 आणि अर्चना गोडबोले वय 10, यांचा मृतांत समावेश आहे. तर आरती गोडबोले या मुलीवर उपचार सुरु आहेत. या धक्कादायक प्रकारानंतर पोलीस आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
नेमकं काय घडलं?
रंजना गोडबोले या त्यांची मुलगी आणि दोन पुतणींसह कपडे धुण्यासाठी गोदावरी नदीवर गेल्या होत्या. त्यांच्यासोबत दहा वर्षांच्या दोन मुली असल्याने खोल पाण्यात न जाता, पाण्याचा अंदाज घेऊन कपडे धुणे सुरु होते. मात्र गोडबोले कुटुंबावर काळाने घाला घातला. रंजना गोडबोले आणि त्यांच्यासोबत असलेली मुलगी आणि दोन पुतण्या पाण्यात बुडाल्या. पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडून तिघींचा दुर्दैवी मृत्यू झाला.
चौघीही बुडू लागल्याने नेमकं काय घडतंय हे कुणालाच कळालं नाही. यापैकी तिघींचा बुडून मृत्यू झाला. तर आरती गोडबोले या चिमुकलीला वाचवण्यात यश आलं. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तिच्यावर उपचार सुरु आहेत.
या प्रकाराची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नेमकं काय घडलं, महिला आणि दोन मुली कशा बुडाल्या याचा तपास पोलीस करत आहेत.
मुलींसह महिला बुडाल्याचं वृत्त मिरगावात वाऱ्यासारखं पसरलं. एकाच घरातील तिघींचा बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. गोडबोले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दोन दिवसांच्या पावसाने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. शिवाय गेल्यावर्षीच्या पावसामुळेही आधीच गोदावरी नदीला मुबलक पाणी आहे, त्यामुळे प्रशासनाकडून नदी काठी जाऊ नये, असं आवाहन करण्यात येतंय.
नदी काठावर धोबीघाटाची मागणी
गोदावरी नदीला पाणी आल्यानंतर अशा घटना दरवर्षी घडतात. नदीला पूर आल्यानंतर नदीकाठच्या लोकांना केवळ सतर्क राहण्याचा इशारा देण्यात येतो. मात्र अशा घटना टाळण्यासाठी नदी काठावर धोबीघाट तयार करावा जेणेकरून हकनाक निष्पाप जीव जाणार नाहीत अशी मागणी स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांनी केली आहे.
संबंधित बातम्या
कोरोनाग्रस्त सासूबाईंची डेंजर विकृती, सुनेला जबरदस्ती मिठी मारली, रिपोर्ट आला…