नाशिक जिल्ह्यात 6 नगरपंचायतीसाठी 402 अर्ज; देवळा येथे 4, निफाड 3, कळवणला 2 प्रभागांमधील निवडणूक रद्द
नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींसाठी 402 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. सध्या पेठ, सुरगाणा, निफाड, देवळा, कळवण आणि दिंडोरी या मुदत संपलेल्या नगरपंचायतीची निवडणूक सुरू आहे.
नाशिकः नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींसाठी 402 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. सध्या पेठ, सुरगाणा, निफाड, देवळा, कळवण आणि दिंडोरी या मुदत संपलेल्या नगरपंचायतीची निवडणूक सुरू आहे.
कळवणच्या नगराध्यक्षा बिनविरोध
कळवणच्या नगराध्यक्षा सुनीता कौतिक पगार या बिनविरोध निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे त्या कळवण येथील पहिल्या नगरसेविका आणि पहिल्याच नगराध्यक्षा आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. गेली निवडणूक चांगलीच गाजली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार आणि कळवण नगरपंचायतीचे गटनेते कौतिक पगार यांनी बाजी मारली होती. नगरपंचायतीच्या पहिल्याही निवडणुकीत सुनीता पगार या बिनविरोध निवडून आल्या होत्या हे विशेष.
येथील निवडणूक रद्द
राज्य सरकारने काढलेल्या ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 27 टक्के आरक्षण असलेल्या मागासवर्गीय प्रवर्गातील राखील प्रभागाची निवडणूक रद्द करण्यात आली आहेत. त्यात देवळा येथे 4, निफाड येथे 3 प्रभागांची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. तर कळवणमध्ये 2 प्रभागांची निवडणूक रद्द करण्यात आली आहे.
इतके आले अर्ज
पेठ नगरपंचायतीसाठी 75 अर्ज आले आहेत. त्यात पहिल्या महिला नगराध्यक्ष लता सातपुते व नंतरचा अडीच वर्ष नगराध्यक्ष राहिलेले मनोज घोंगे यांचा समावेश आहे. देवळा नगरपंचायतीसाठी 60 अर्ज आले आहेत. निफाड नगरपंचायतीसाठी 81 जणांनी उमेदवारी दाखल केली आहे. कळवणला 51 आणि दिंडोरी येथे 102 अर्ज दाखल झाले आहेत. सुरगाणा येथे 74 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
5 ग्रामपंचायतींची निवडणूक स्थगित
सिन्नर तालुक्यात 5 ग्रामपंचायतींची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. त्यात खंबाळे, सायाळे, उजनी येथे एकएकच अर्ज आले होते. त्यामुळे येथील निवडणूक बिनविरोध होणार होती. मात्र, ही निवडणूक रद्द केल्याने निवडून येण्याची आशा असलेल्या उमेदवारांची घोर निराशा झाली.
नियम पाळण्याची गरज
सध्या नगरपंचायतींची निवडणूक सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात महापालिका निवडणुका आहेत. मात्र, या निवडणुकांच्या प्रचारात गर्दी करू नये. कोरोनाचा प्रसार होईल, असे वर्तन उमेदवारांनी करू नये. प्रत्येकांनी मास्क वापरावा, सुरक्षित अंतर ठेवावे या नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
इतर बातम्याः
Nashik ZP | झेडपीतले कारभारी वाढणार; गटात 11 आणि गणात 22 ची वाढ, तरण्याबांड नेतृत्वाला संधी…!