VIDEO : कबड्डीच्या मैदानात उतरल्या 78 वर्षीय आजी, आजीबाईचा कबड्डी खेळतानाचा हा व्हिडीओ एकदा बघाचं
तारणबाई येडे यांनीही कबड्डी स्पर्धेत सहभाग घेतला. विशेष म्हणजे तारणबाई यांचं वय ७८ वर्षे आहे. तरीही त्यांनी कबड्डीच्या मैदानात उडी मारली.

गोंदिया : हौसेला वय नाही ही उक्ती आपण नेहमी ऐकत असतो. मात्र त्याची वास्तविक प्राचिती गोंदिया जिल्ह्यात आली. चक्क 78 वर्षीय आजी कबड्डी स्पर्धेसाठी मैदानात उतरल्या. त्यांचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होतोय. गोंदिया जिल्ह्यातील दुर्गम असलेला सालेकसा तालुक्यातील नानव्हा गावात कबड्डीचा सामना होता. निमित्त होतं स्त्री मुक्ती दिनाचं. कब्बडी स्पर्धेत सहभाग नोंदवण्यात आला. वयाचे बंधन न बाळगता या आजीबाई एका कुशल कबड्डीपटूप्रमाणे डाव टाकताना दिसतात. आयुष्यात अनेक सुखदुःखाच्या अनुभवाची शिदोरी असलेली या आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद पहाण्यासारखा होता. नेटकऱ्यांनी या आजीला दाद दिली आहे. 78 वर्षाच्या तारणबाई येडे असं यांचं नाव.
कबड्डी हा खेळ गोंदिया-भंडारा जिल्ह्यात लहान मुलं खेळतात. तरुणांच्याही कबड्डी स्पर्धा होतात. पण, तीन जानेवारीला महिलांसाठी कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी तारणबाई येडे यांनीही कबड्डी स्पर्धेत सहभाग घेतला. विशेष म्हणजे तारणबाई यांचं वय ७८ वर्षे आहे. तरीही त्यांनी कबड्डीच्या मैदानात उडी मारली.
कबड्डी म्हणता म्हणता त्यांना दमही लागला. पण, कबड्डीचा दम काही त्यांनी सोडला नाही. युवकांना लाजविणारा असा हा खेळ त्या खेळत होत्या. तेव्हा ग्रामीण भागातल्या कामेंट्रेटनंही त्यांची स्तुती केली. त्यानंतर त्यांचा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला.
मुलांनी तसेच युवकांनी या आजीबाईकडून खेळाबद्दल प्रेरणा घ्यावी, असं यांचं काम. पण, किती लोकं खेळाची प्रेरणा या आजीबाईकडून घेतील, हे नंतरच कळेल.