थेट उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीलाच धक्का देणारा दावा?, राहुल शेवाळे यांचा मोठा गौप्यस्फोट; सुनावणीवेळी काय घडतंय?
शिवसेना आमदार अपात्रतेवर आज पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांची उलटतपासणी करण्यात आली. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यानंतर आज शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांचीही साक्ष नोंदवण्यात येत आहे. आमदार अपात्रतेच्या सुनावणीत पहिल्यांदाच खासदाराचीही उलटतपासणी होत आहे.
विनायक डावरुंग, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 9 डिसेंबर 2023 : शिवसेनेच्या आमदारांबरोबरच आता खासदारांचीही चौकशी सुरू झाली आहे. आमदार आणि खासदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. आज शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची उलट तपासणी करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे वकील अनिल साखरे हे राहुल शेवाळे यांची उलट तपासणी घेत आहेत. यावेळी राहुल शेवाळे यांनी अत्यंत धक्कादायक विधान केलं आहे. शेवाळे यांनी शिवसेनेचा कार्यकारिणी ठरावच फेटाळून लावला आहे. 23 फेब्रुवारी 2018 रोजी कोणतीच बैठक झाली नव्हती. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकारीणीचा ठराव झाल्याचं मला माहीत नाही. तुम्ही दाखवत असलेला (वकिलांनी) ठराव मी पहिल्यांदाच पाहत असल्याची साक्ष राहुल शेवाळे यांनी दिली आहे. शेवाळे यांच्या या साक्षीमुळे उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीलाच आव्हान मिळाले का? अशी चर्चा आहे.
सुनावणीवेळी काय घडलं? संवाद जसाच्या तसा
वकील अनिल साखरे : 23 जानेवारी हा दिवस तुमच्यासाठी काय आहे?
खासदार राहुल शेवाळे : मी शिवसेनेत 2000 सालापासून सदस्य आहे. 23 जानेवारी हा दिवस आमच्या सारख्या। सर्व शिवसैनिकांसाठी महत्त्वाचा आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा त्यादिवशी वाढदिवस असतो. राज्यातील सर्व शिवसैनिक एकत्र येऊन हा दिवस साजरा करतात. त्या दिवशी सर्व नेते भाषण करतात आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन करतात.
अनिल साखरे : त्यावेळी काही कामकाज झाले का?
राहुल शेवाळे : नाही
अनिल साखरे : 27 फेब्रुवारी 2018च्या पत्राबाबत काय सांगायचे असेल तर सांगा.
राहुल शेवाळे : हे पत्र मी पहिल्यांदाच पाहत आहे. ही खोटी माहिती दिलेली आहे.
( 27 फेब्रुवारी 2018चे पत्र राहुल शेवाळे यांना दाखवण्यात आले. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून काढलेली ही प्रिंट आऊट आहे. 23 फेब्रुवारी 2018 रोजी शिवसेनेच्या कार्यकारिणीचा हा ठराव आहे)
( शिवसेनेच्या कार्यकारिणी निवडीचा ठराव 23 फेब्रुवारी 2018 रोजी मंजूर झाला. त्याची प्रत 27 फेब्रुवारी 2018 रोजी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली. खासदार अनिल देसाई यांच्या सहीच्या ठरावाची ही प्रत राहुल शेवाळे यांना दाखवण्यात येत आहे.)
साखरे : या पत्रात सांगण्यात आले आहे, एका सभेत हा ठराव झाला आहे
शेवाळे : अशी कुठलीच सभा झाली नाही, तर ठरावाचा प्रश्नच उद्भवत नाही.
राहुल शेवाळे : 25 जून 2022 ला मी सेना भवनला गेलो होतो. सेना भवन हे माझ्या लोकसभा मतदारसंघात येत. मी सेना भवनाला नेहमीच जात होतो. त्यावेळी जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. त्याबाबत 25 तारखेपूर्वी आम्ही सर्व खासदारांनी बैठक घेतली. तेव्हा असे ठरवलं होतं की, उद्धव ठाकरे यांना एनडीएमध्ये सामील व्हा अशी विनंती करायची. उद्धव ठाकरे येणार होते म्हणून 25 तारीखला आम्ही सर्व जण त्यांच्याकडे गेलो. आम्ही उद्धव ठाकरेंना तिथे भेटलो. 2019 ला आपण एनडीए म्हणून निवडणुक लढवली होती. मतदारानी महायुती म्हणून निवडून दिले होते. मोदींजींच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली होती. त्यामुळे आपण एनडीएमध्ये सामील झालं पाहिजे हे आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी जो मविआचा निर्णय घेतला, त्यामुळे मतदार नाराज झालेले आहेत. 2024 ची निवडणूक जिंकायची असेल तर आपल्याला मोदींजींच्या नेतृत्वाखाली लढली पाहिजे असे आम्ही त्यांना सांगितले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले आहे. 370 कमल हटवले, राम मंदिरबाबत निर्णय घेतला. त्यामुळे आपण भाजप सोबत जायला हवं असे आम्ही सांगितले.
शेवाळे : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वारंवार सांगितले होते की मी काँग्रेससोबत जेव्हा जाईन तेव्हा मी माझं दुकान बंद करेन. काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे आमदार आपल्या स्थानिक कार्यकर्त्याला त्रास देत आहेत आणि त्यांना काम करण्यास अडचणी निर्माण करत आहेत असे आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितले. उद्धव ठाकरे यांनी आमचं हे म्हणणं ऐकून घेतलं आणि म्हणाले मी माझं म्हणणं तुम्हाला कळवतो.
शेवाळे : ही सर्व चर्चा संपवून मी आणि इतर खासदार निघून गेलो.
साखरे : याशिवाय 25 जूनला कुठले ठराव झाले का?
शेवाळे : 25 तारखेला असे कुठलेही ठराव झाले नाहीत.
साखरे : शिवसेनेची घटना कधी तयार झाली, त्यात नंतर कुठला बदल झाला आहे का?
शेवाळे : शिवसेना पक्षाची घटना बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केली आहे. त्याच्यानंतर त्यात कुठलाही बदल केलेला नाही.
साखरे : 1999ची घटना आपण म्हटली, तो हाच कागद आहे का ते सांगा. (शेवाळे यांना घटनेची प्रत दाखवण्यात आली)
शेवाळे : निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर याची प्रत आहे.
( 1999 च्या घटनेची प्रत शिंदे गटाकडून सादर करण्यात आली. या प्रतीवर ठाकरे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे. ही प्रत रेकॉर्डवर नसल्याचा ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद. याउलट ही प्रत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचा शिंदे गटाच्या वकिलांचा बचाव. ही प्रत रेकॉर्डवर घेण्याचा विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला. याआधी ठाकरे गटाच्या वकिलांची कागदपत्रे ही रेकॉर्डवर घेतल्याचा दाखला दिला. या सुनावणीत हे कागदपत्र प्रथमच सादर केला जात असल्याचा ठाकरे गटाचा आक्षेप अध्यक्षांकडून रेकॉर्डवर नोंदवण्यात येत आहे. याआधी संधी देऊनही साक्षीदारांनी ही कागदपत्रे सादर केली नाहीत, असेही ठाकरे गटाच्या वकिलांनी नोंदवले आहे.
साखरे : 23 जानेवारी 2018 रोजी घटने संदर्भात काही चर्चा झाली असेल तर सांगा. (ठाकरे गटाच्या वकिलांकडून पुन्हा आक्षेप)
देवदत्त कामत : हे प्रश्न आधी दाखवण्यात यावेत, नंतर ते विचारावे
साखरे : हा वेळकाढूपणा आहे
कामत : तुम्ही मुळात मराठीत प्रश्न विचारत आहात.
साखरे : मग काय झालं? हा महाराष्ट्र आहे. मराठीत विचारण्यात आक्षेप का?
अध्यक्ष : मराठीत प्रश्न विचारण्यात गैर काहीच नाही. मी तुमच्यासाठी ( कामत ) इंग्रजी अनुवाद करत आहे.
साखरे : जून 2014 ते जून 2022 दरम्यान तुम्ही राष्ट्रीय प्रतिनिधी सभेला उपस्थित होता का?
शेवाळे : या काळात प्रतिनिधी सभा झाली नाही, आणि मला निमंत्रित केले नाही.
साखरे : संसदीय गटनेते पदाची निवड कशी होते? हे तुम्ही सांगू शकता का? 2019 पासून काही झाले असेल तर सांगा.
शेवाळे : संसदेचे सदस्य म्हणजे खासदार हा संसदीय गटनेता निवडतात. लोकसभेतील शिवसेना खासदार यांनी मला लोकसभा गटनेता म्हणून निवडले आहे आणि लोकसभा अध्यक्षांनी माझ्या निवडीला अधिकृत मान्यता दिली आहे. 19व्या लोकसभेच्या शिवसेना गटनेते पदावर त्यांनी माझी नियुक्ती मान्य केली आहे.