‘…म्हणून नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांची भेट घेतली’, आदित्य ठाकरे यांनी सांगितलं खरं कारण
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची बिहारमध्ये जाऊन आज भेट घेतली. या भेटीमागचं नेमकं कारण काय होतं याबाबतचं कारण त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं.
पाटणा : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची बिहारमध्ये जाऊन आज भेट घेतली. आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावरुन राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. बिहारमध्ये आधी भाजपची सत्ता होती. पण नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव आणि इतर पक्षांची साथ पकडत भाजपला धोबीपछाड देत सरकारमधून आपला पाठिंबा काढला. त्यामुळे भाजपचं सरकार कोसळलं. त्यानंतर नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव आणि इतर मित्र पक्षांसोबत मिळून नवं सरकार स्थापन केलं.
महाराष्ट्रात भाजपकडून शिवसेनेला संपवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले, भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर सडकून टीका केली जातेय. त्यामुळे भाजपला डिवचण्यासाठी आदित्य ठाकरे हे बिहार दौऱ्यावर गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरुय.
दरम्यान, बिहारचा दौरा पूर्ण झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. बिहारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरे परतीच्या प्रवासासाठी पाटणा विमानतळावर आले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आपण बिहारमध्ये का आलो? या मागचं कारण सांगितलं.
“छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती भेट म्हणून दिलीय. तेजस्वी यादव यांची भेट घेणार असल्याचं ठरलं होतं. इथे आल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकते का विचारलं? आणि भेट घडून आली”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“देशात राजकारण खूप चाललेलं आहे. दोन राज्यातील नेत्यांची भेट म्हणू शकता. पण आम्ही दोन तरुण नेते आहोत. तेजस्वी यांचं चांगलं काम सुरुय. विशेष म्हणजे ज्यांनी काश्मीरमध्ये पीडिपीसोबत काम केलंय त्यांनी बोलू नये”, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
“तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांच्यासोबत भेटीगाठी, बोलणंचालणं होत राहायचं. पण मध्यंतरी कोरोना काळ होता. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. पण नितीश कुमार यांचं चांगलं कार्य दिसत आहे. बिहारमध्ये प्रगती होताना दिसतेय. आम्ही हाच विचार केला की, बातचित सुरुय तर तेजस्वी आणि नितीश यांची भेट का नको घ्यायला? त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दोघांची भेट घेतली. दोघांसोबत चांगली चर्चा झाली”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.
“वेगळ्या विषयांवर चर्चा झाली. पर्यावरण, विकासकामे, वेगवेगळ्या इंडस्ट्रिस, सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशात जो तरुण चांगलं काम करण्याचा विचार करतोय, रोजगारासाठी बातचित करु इच्छूक आहे, संविधानासाठी काम करु इच्छूक आहे, सर्वांनी काम करत राहीलं तर देशात काही चांगलं करुन दाखवू शकतो”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“आम्ही राजकारण आणि निवडणुकीची गोष्ट केलेली नाही. कारण इतर पक्ष त्यावरच चर्चा करतात. पण आज सर्वात महत्त्वाची गोष्ट हीच होती की, भेट घेणं जरुरीचं होतं. दोन्ही कुटुंबाची संबंध चांगले आहेत. कटुता आलेली नाही. दोस्ती अवितरतपणे जीवंत राहील. त्यांना मुंबईला येण्याचं निमंत्रण दिलंय. आता भेटीगाठी चालू राहतील. महाराष्ट्रातील पर्यावरण, वन पाहण्यासाठी यावं. प्रत्येकवेळा राजकारण करणं जरुरीचं नाही. तेजस्वी चांगलं काम करत आहेत”, असंदेखील ते म्हणाले.