Nashik| बीएसएफ जवानाचा लासलगाव-मनमाड रोडवर अपघाती मृत्यू, पत्नीसह मुलांवर उपचार सुरू
मनमाडकडून लासलगावकडे येणाऱ्या कारने दुचाकीला भारतनगर (भाडणे) या गावाजवळ जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील जवान रमेश गुंजाळ हे गंभीर जखमी झाले होते.
लासलगावः सुट्टीनिमित्त गावी आलेल्या बीएसफ जवानाचा लासलगाव-मनमाड रोडवर झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. रमेश म्हातारबा गुंजाळ असे त्यांचे नाव असून, त्यांच्यावर चांदवड तालुक्यातील रायपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजस्थानात होते कर्तव्यावर
रमेश गुंजाळ हे राजस्थान येथे कर्तव्यावर होते. मात्र, सुट्टीनिमित्त ते चांदवड तालुक्यातील रायपूर या आपल्या गावी आलेले. त्यानंतर गुंजाळ हे पत्नी आणि दोन मुलांसह नातेवाईकांना भेटण्यासाठी दुचाकीवरून मनमाडला निघाले होते. मात्र, मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास मनमाडकडून लासलगावकडे येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला भारतनगर (भाडणे) या गावाजवळ जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील जवान रमेश गुंजाळ हे गंभीर जखमी झाले होते.
उपचारादरम्यान मृत्यू
गुंजाळ यांच्यावर मनमाड येथे प्रथमिक उपचार करून मालेगाव येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी आणि जखमी मुलांवर मालेगाव येथे उपचार सुरू आहे. गुंजाळ बीएसएफमध्ये जवान म्हणून सतरा वर्षांपूर्वी दाखल झाले होते. त्यांच्या या मृत्युमुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर आज रायपूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
ट्रॅक्टर उलटून मजूर जखमी
लासलगावमध्ये दुसऱ्या एका घटनेत ट्रॅक्टर पलटून मजूर जखमी झाल्याची घटना घडली आहे. लासलगाव विंचूर रस्त्यावरील ॲक्सिस बँकेसमोर ट्रक आणि मोटरसायकलचा अपघात झाला होता. यात एक मोटरसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली. यावेळी अपघातग्रस्त ट्रक हा रस्त्याच्या कडेला उभा होता. मात्र, बुधवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास या ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जाणाऱ्या टँकरने विटाने भरलेल्या ट्रॅक्टरला कट मारला. त्यामुळे ट्रॅक्टरचालकाचा ताबा सुटला. ट्रॅक्टर चालकाने अचानक ब्रेक मारले. त्यामुळे विटाने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली. या ट्रॉलीवर बसलेले पाच मजूर जखमी झाले आहेत. ही घटना जवळच असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र, अपघातग्रस्त ट्रक पोलिसांनी रस्त्यावरून हलवणे गरजेचे होते. याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
इतर बातम्याः
OBC Reservation: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्याव्यात?; अजित पवारांनी सांगितला उपाय
‘काळजाच्या तुकड्याने’ यकृताचा तुकडा दिला, पोलीस पित्यासाठी नवी मुंबईच्या लेकीचं दातृत्व!
Bailgada Sharyat | बैलगाडा शर्यतींची परंपरा स्पेनमधून महाराष्ट्रात कशी आली? जाणून घ्या रंजक गोष्ट