सातव्या वेतन आयोगानुसार एस.टी. कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार का? अनिल परबांनी पवारांच्या उपस्थितीत अट सांगितली
अनिल परब म्हणाले की, राज्य शासनाने सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ द्यावी, या मागणीचा विचार एसटी सुरू झाल्यानंतर करण्यात येईल, याबाबत शासन सकारात्मक विचार करेल.
परिवहन मंत्री अनिल परब आणि शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आणि आजच्या चर्चेबाबत महिती दिली. अनिल परब म्हणाले की, राज्य शासनाने सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ द्यावी, या मागणीचा विचार एसटी सुरू झाल्यानंतर करण्यात येईल, याबाबत शासन सकारात्मक विचार करेल. कारण जी पगारवाढ दिली आहे, ते दोन करार आणि फरक यांचा विचार करून शासन निर्णय घेईल यावर आज चर्चा झाली. तसेच जे कर्मचारी कामावर येतील त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
कामावर आल्यास कारवाई नाही
आतापर्यंत आम्ही कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी तीनवेळा आम्ही मुदत दिली होती, यावेळी हेही सांगितलं होतं की, कामावर आल्यावर कारवाई होणार नाही. ज्या एसटी कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही, अशा कामगारांवर कोणतीही कारवाई होणार नाही, कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांबद्दलचा अंतिम निर्णय लवकरच घेऊ. जसे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आमचे दायित्व आहे, तसेच जनतेच्या प्रतीही आमचे दायित्व आहे, त्यामुळे आम्हाला तोही विचार करावा लागेल. तशी चर्चा कृती समितीबरबोर झाली आहे. जनतेला वेठीस धरून कुणालाही फायदा होणार नाही, असेही परब म्हणाले.
शरद पवार काय म्हणाले?
यावेळी शरद पवार म्हणाले की, माझ्या दृष्टीने या संपामुळे प्रवाशांची जी स्थिती झाली, त्याचे वर्णन न केलेलं बरं. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे सगळ्या गोष्टींचा परिणाम महाराष्ट्र शासनाच्या अर्थकारणावर होत आहे. या स्थितीतही जेवढं जास्त देता येईल, तेवढं देण्याचा प्रयत्न केला. कृती समितीच्या जेवढ्या संघटना आहेत, त्यांच्या प्रतिनिधींना कामगारांच्या हिताची काळजी आहे. त्याचबरोबर प्रवाशांचं हितही जपलं गेलं पाहिजे, असा त्यांचाही दृष्टीकोण आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना विनंती आहे की, आपली बाधिलकी प्रवाशांशी आहे, त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांचे आवाहन सकारात्मक घेऊन एसटी सुरू करावी. बांधवांनो विचार करा, विलिनीकरणाची लढाई कोर्टावर सोपवूया, कामावर येवूया असे आवाहन शरद पवार यांनी केले.