यशोमती ठाकूर यांच्यावरील ‘ते’ आरोप भोवले. नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात?
राणा दाम्पत्य आणि यशोमती ठाकूर यांच्यातील शाब्दिक चकमकीनंतर अमरावतीमधील वातावरण शांत होईल असे वाटत होते. मात्र, कॉंग्रेसने आता नवनीत राणा यांची खासदारकीच धोक्यात आणणारा निर्णय घेतला आहे.
अमरावती : 18 सप्टेंबर 2023 | अमरावती जिल्ह्यामध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दाम्पत्य एकीकडे आणि दुसऱ्या बाजूला कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर, आमदार बच्चू कडू, आमदार बळवंत वानखडे असा संघर्ष सुरु झाला आहे. दहीहंडी निमित आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार नवनीत राणा यांनी माजी मंत्री आणि कॉंगेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केला होता. यशोमती ठाकूर यांनी निवडणूक काळात आपल्याकडून कोऱ्या नोटा घेतल्या, पण प्रचार केला नाही असा आरोप केला होता. त्यावरून अमरावती जिल्ह्यातील राजकारण पेटले आहे.
आमदार रवी राणा यांनी दर्यापूरचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांच्यावरही जहरी टीका केली होती. दर्यापूरचे आमदार तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या चपला उचलतात अशी टीका त्यांनी केली होती. त्याला उत्तर देताना आमदार बळवंत वानखडे यांनी ‘जात प्रमाणपत्रासाठी राणा केंद्राचे तळवे चाटतात’ असे म्हणत पलटवार केला होता.
‘तू चोट्टा, बायको चोट्टी’, फडतूसपणा करतो
यशोमती ठाकूर यांच्यावर आरोप करताना आमदार रवी राणा यांनी ‘विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्या लिस्टमध्ये यशोमती ठाकूर यांचे नाव होते. पण, मंत्रीपद मिळत नाही म्हणून त्या आल्या नाहीत.’ असा आरोप केला होता. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या या आरोपानंतर कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर चांगल्याच भडकल्या होत्या. औकातीत रहावे, ‘तू चोट्टा, बायको चोट्टी’, फडतूसपणा करतो. काहीही बोलतो. तुम्हाला वहिनी म्हणतो. म्हणून मागच्यावेळी दर दर फिरलो होतो. पण, त्याचे प्रमाणपत्र खोटे निघाले, त्याच चोर आहेत’ असे प्रत्युत्तर दिले होते.
राणा दाम्पत्य आणि यशोमती ठाकूर यांच्यातील शाब्दिक चकमकीनंतर अमरावतीमधील वातावरण शांत होईल असे वाटत होते. मात्र, कॉंग्रेसने आता नवनीत राणा यांची खासदारकीच धोक्यात आणणारा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने खासदार नवनीत राणा यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
खासदारकी रद्द करा
अमरावती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत काँग्रेसच्या अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष यांनी ही तक्रार दाखल केली आहे. खासदार नवनीत राणा यांनी तिवसा येथील दहीहंडी कार्यक्रमात काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर 2019 लोकसभा निवडणुकीत कोऱ्या कडक नोटा घेतल्याचा आरोप केला. खासदार नवनीत राणा यांनी या कोऱ्या नोटा कुठून आणल्या असा प्रश्न करत त्यांनी केलेल्या आरोपाची निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करावी. तसेच, खासदार नवनीत राणा यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.