मोठी बातमी! दापोलीतील साई रिसॉर्ट जमीनदोस्त होणार? उद्या कारवाईची दाट शक्यता
दापोलीतून एक मोठी बातमी समोर आलीय. दापोलीतील वादाच्या भोऱ्यात सापडलेलं साई रिसॉर्टवर उद्या कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.
रत्नागिरी : दापोलीतून एक मोठी बातमी समोर आलीय. दापोलीतील वादाच्या भोऱ्यात सापडलेलं साई रिसॉर्टवर उद्या कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. संबंधित रिसॉर्ट हे शिवेसनेचे नेते अनिल परब यांच्या मालकीचा असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. पण अनिल परबांनी ते आरोप फेटाळले होते.
साई रिसॉर्ट हे समुद्र किनाऱ्याजवळच उभारण्यात आलंय. हे रिसॉर्ट उभारलं तेव्हा केंद्रीय पर्यावरण विभागाने आखून दिलेल्या नियमांचं पालन झालं नाही, असा आरोप करण्यात आला होता.
संबंधित रिसॉर्ट हे अनधिकृत असल्याचा वारंवार आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी कोर्टात अनेक दिवसांपासून सुनावणी सुरु होती. अखेर या प्रकरणी प्रशासन मोठी कारवाई करण्याची दाट शक्यता आहे. साई रिसॉर्टवर उद्या कारवाई होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे साई रिसॉर्टवर कारवाई होईल त्यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या देखील त्या ठिकाणी हजर राहण्याची शक्यता आहे. सोमय्या या प्रकरणी सुरवातीपासून पाठपुरावा करत आहेत.
काही दिवसांपूर्वी राज्याच्या बांधकाम विभागाने रिसॉर्ट पाडण्याबाबतची जाहीरात स्थानिक वृत्तपत्राला दिली होती. तीन महिन्यात रिसॉर्टचं पाडकाम केलं जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं होतं.
चिपळूणच्या बांधकाम विभागाकडून स्थानिक वर्तमानपत्र ‘दैनिक तरुण भारत’मध्ये टेंडर जाहिरात देण्यात आली होती. साई रिसॉर्ट पाडण्यासाठीची ही जाहिरात असून कंत्राटदारांना 10 नोव्हेंबरपर्यंत टेंडर भरण्याचं आवाहन या जाहिरातीतून करण्यात आलं होतं.
दापोली येथील साई रिसॉर्ट एनएक्सचे बांधकाम, पोचरस्ता, कंपाऊड वॉल, इमारतीच्या भिंती पायापर्यंत पाडायच्या आहेत. तसेच रिसॉर्ट पाडल्यानंतर उरलेला सिमेंट आणि मातीचा ढिगारा उचलून त्याची विल्हेवाट लावायची आहे. त्यानंतर रिसॉर्ट पाडलेल्या जागेचं सपाटीकरण करायचं आहे, असं या टेंडरमध्ये कामाचं स्वरुप देण्यात आलं होतं.