‘लाडकी बहीण’नंतर महिलांसाठी सरकारकडून आणखी एका मोठ्या योजनेची घोषणा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अधिवेशनात घोषणा केल्यापासून चर्चेत आहे. महिलांचा या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. महिलांसाठी अधिवेशनात आणखी एक घोषणा करण्यात आली होती. त्याची देखील अंमलबजावणी आता सुरु झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी एक मोठी घोषणा केली होती. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेतून महिलांना दरमहिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेला आता चांगला प्रतिसाद देखील मिळत असल्याचं दिसून आल आहे. लाडकी बहीण योजना ही मध्यप्रदेशात सुरुवातीला लागू करण्यात आली होती. योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने महाराष्ट्रात देखील तिची घोषणा करण्यात आली. 15 ऑगस्टच्या आधी किंवा रक्षाबंधनच्या दिवशी महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी नोंदणी सुरु झाली आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी आणखी एक मोठी योजना जाहीर केली आहे.
10 हजार महिलांना होणार फायदा
17 शहरांमधील 10 हजार महिलांना या योजनेचा फायदा मिळणार आहे.या योजनेच्या अंतर्गत रिक्षा खरेदीची २० टक्के रक्कम ही सरकारकडून देण्यात येणार आहे. महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे.
20 टक्के रक्कम सरकार देणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, आम्ही महिलांसाठी आणखी एक योजना आणली आहे. गुलाबी रिक्षा (Pink Rickshaw) असं या योजनेचं नाव आहे. या योजनेतून 20 टक्के रक्कम महिलेने भरायचे. २० टक्के सरकार तर ७० टक्के बँक लोनमधून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
योजनेचे फायदे काय
महाराष्ट्र सरकार जाहीर केलेल्या पिंक ई रिक्षा योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना ई रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाईल. यासाठी कमाल आर्थिक सहाय्य रु. 80,000/- प्रदान केले जातील.
पात्रता काय?
लाभार्थी महिला महाराष्ट्राच्या कायम रहिवासी असाव्यात. लाभार्थी महिलांकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा. आधार कार्ड. चालक परवाना. मोबाईल नंबर. बँक खाते तपशील. पासपोर्ट साइज फोटो.