संभाजी राजे यांच्यावर गुन्हा दाखल होणार?, कारण काय ?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या किल्ले विशाळगडावर झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या लोकांच्या आंदोलनाला काल (रविवार) हिंसक वळण लागले होते. राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी गजापूर हद्दीतील अनेक घरांना लक्ष करत दगडफेक केल्याचा आरोप केला जात आहे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या किल्ले विशाळगडावर झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या लोकांच्या आंदोलनाला काल (रविवार) हिंसक वळण लागले होते. राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी गजापूर हद्दीतील अनेक घरांना लक्ष करत दगडफेक केल्याचा आरोप केला जात आहे. तसेच त्या परिसरात जाळपोळ आणि वाहनांची तोडफोड झाली असाही आरोप करण्यात आला. अखेर याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याप्रकरणी पुण्याचे रवींद्र पडवळ , बंडा साळोखे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला गालबोट लावल्या प्रकरणी कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर आले असून, आता त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. .
याप्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये 500 हून अधिक लोकांच्याविरोधात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. कलम 132, 189 ( 2), 190, 191 (2) , 191 (3),323, 298, 299 (49), 189 (5 ) यासह पोलिस अधिनियम 37 (1) उल्लघन 135 या नुसार गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी तपास सुरू असून त्या तपासात आणखी नावे निष्पन्न झाल्यानंतर इतरांवरही गुन्हे दाखल होणार आहेत.
पुण्याचे रवींद्र पडवळ याच्या नेतत्वाखाली आणि संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली विशाळगडावर आणि विशाळगडाच्या पायथ्याशी दोन वेगवेगळी आंदोलनं झाली होती . मात्र त्या आंदोलनाला गालबोच लागले आणि दगडफेक, तसेच जाळपोळ करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी सुरू असलेल्या पोलीस तपासात आणखी नावे निष्पन्न होतील. विशाळगडावरील व आसपासच्या परिसरातील CCTV आणि इतर व्हिडियो रेकॉर्डिंग पाहून कोल्हापूर पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत.
शिवभक्तांवर गुन्हा दाखल करू नका
या प्रकरणात आक्रमक भूमिक घेतलेल्या संभाजीराजे यांनीही गडावर हजेरी लावली. माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी, चालेल पण शिवभक्तांवर गुन्हा दाखल करू नका, सरकारने दिलेली आश्वासने पाळावीत, अन्यथा आक्रोश आणखी वाढेल असा इशारा संभाजी राजे छत्रपती यांनी दिला होता. अतिक्रमण काढून घेतलं जाईल, असं आश्वासन देण्यात आल्याचे ते म्हणाले. ज्या काही घटना घडल्या त्या घडायला नको होत्या पण तो शिवभक्तांचा आक्रोश होता. जर सरकारने दोन दिवस आधीच हा निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. प्रसंगी माझ्यावर गुन्हा दाखल करा पण शिवभक्तांवर गुन्हे दाखल करू नका असंही संभाजीराजे यांनी म्हटलं.
मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा
दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी एक ट्विट करत आपण सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे असून स्वतः शाहूवाडी पोलिस स्टेशन येथे हजर होण्यास जात असल्याचे नमूद केले आहे.
काल विशाळगड येथे झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केलेली आहे. काही शिवभक्तांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. प्रशासन स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी व स्वतःचा बेजबाबदारपणा लपविण्यासाठी जाणीवपूर्वक शिवभक्तांना लक्ष्य करत आहे. मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी…
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) July 15, 2024