भर सभेत भाजप शिवसेना नगरसेवक भिडले, कारण काय?
भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर बोलत असताना शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक सचिन शिंदे मध्येच बोलल्याने हा वाद पेटला आणि थेट एकमेकांच्या अंगावर जात खडाजंगी झाली आहे.
अहमदनगर : अहमदनगरला महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेवक आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आहे. आज महासभेत भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक सचिन शिंदे यांची चांगलीच हमरातुमरी होऊन एकमेकांच्या अंगावर जाण्यापर्यन्तचे वाद बघायला मिळाले. भर सभागृहात दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच दरम्यान सभागृहात झालेला गोंधळ पाहून इतर नगरसेवकांनी मध्यस्ती करत हा राडा मिटवण्याचं काम केले. भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर बोलत असतांना ठाकरे गटाचे नगरसेवक सचिन शिंदे यांनी बोलण्यास सुरुवात केल्यानं हा वाद झाला आहे.
मनोज कोतकर हे आपल्या प्रभागातील समस्या सभेत मांडत होते. मात्र, सचिन शिंदेनी यावर आक्षेप घेतला. सभेच्या अजेंड्यावर जे प्रश्न आहेत ते प्रश्न घ्या, असे शिंदे कोतकरांना म्हणाले यावरुन त्या दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली होती. आणि त्यानंतर दोघांमध्ये राडा झाला.
भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर बोलत असताना शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक सचिन शिंदे मध्येच बोलल्याने हा वाद पेटला. एकमेकांच्या अंगावर जात एकमेकांना बघून घेऊ असेही दोघांकडून धमकी देण्यात आली होती. त्यामुळे मोठा गोंधळ सभागृहात पाहायला मिळाला.
खरंतर जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी पाठविण्यात आलेल्या नगरसेवकांना सभागृहात प्रश्न मांडण्याचा रस आहे की भांडणाचा हा मुद्दा देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामध्ये ही संपूर्ण परिस्थिती पाहता राजकीय वातावरण यानिमित्ताने तापले आहे. शहरातील प्रश्न मांडण्यावरुन झालेला राडा चर्चेचा विषय ठरत आहे.
खरंतर लोकप्रतिनिधी हे प्रश्न मांडत असतांना त्याच दरम्यान काही चूक आढळून आल्यास त्यावर बोट ठेवून प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र, मासळी बाजारात जसा राडा होतो अगदी तसाच राडा सभागृहात पाहायला मिळतो. त्यामुळे लोकप्रतिनिधींना ही बाब शोभणारी नसून यावरून शहरात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
अहगमदनगर पालिकेच्या सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सभागृहात राजकीय आखाडा निर्माण झाल्याने लोकप्रतिनिधी कोणत्या थरला जाऊ शकतात यासाठी आजचं हे दृश्य पुरेसे आहे. राज्यातील बहुतांश पालिकेच्या सभागृहात असा गोंधळ पाहायला मिळाला आहे.
यापूर्वी छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नाशिक, मुंबई आणि पुणे अशा विविध बाजार समितीत असं चित्र पाहायला मिळाले आहे. त्यामुळे पुढील काळात सभागृहात राजकीय शिस्त असण्याची देखील तितकीच गरज आहे.