जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवरुन नगरमध्ये नाराजीचे फटाके, पराभूत चंद्रशेखर घुले यांचा रोख कुणावर?
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत झालेला पराभवावरुन अहमदनगरमधील वातावरण चांगलेच तापले आहे. जाहीर सभा घेऊन नाराजीचे फटाके फुटू लागले आहे. त्यामुळे आता नेमकी कुणावर होणार याची चर्चा होऊ लागली आहे.
अहमदनगर : अहमदनगरला जिल्हा बँक अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी जाहीर सभा घेत नाराजी व्यक्त केली आहे. मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे नाहीतर ठरवून कार्यक्रम करू असा इशारा चंद्रशेखर घुले यांनी विरोधकांना दिला आहे. यावेळी घुले यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत आपली ताकद दाखवली आहे. जिल्हा बँक अध्यक्ष पदाच्या निवडीत संख्याबळ नसतानाही भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांचा विजय झाला. तर महाविकासाकडे पुरेसे संख्याबळ असतानाही चंद्रशेखर घुले यांचा झाला होता पराभव झाल्याने हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे घुले यांनी आपली ताकद दाखवण्यासाठी मंगळवारी मेळाव्याचे आयोजन केले होते.
या निवडणुकीत पराभव झाल्याने माजी आमदार चंद्रशेखर घुले काहीसे नाराज होते. आज त्यांनी शेवगाव येथे कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेऊन आपले भूमिका मांडली. या मेळावात अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गद्दारी केलेल्या राष्ट्रवादीच्या संचालकांवर कारवाईची मागणी केली आहे.
माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी सांगितले की जिल्हा बँकेच्या निवडणुकीत झालेला पराभव निश्चितच अनपेक्षित होता मात्र आता पुढील काळात आपली ताकद काय आहे हे दाखवून देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
तर शेवगाव-पाथर्डी तालुक्यात संघर्ष यात्रा काढणार असल्याचं त्यांनी संगीतले. या यात्रेचा शुभारंभ यावेळी करण्यात आला असून जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर नगर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यात आता नाराजीचे फटाके जोरदार फुटत असल्याचे दिसून येत आहे.
महाविकास आघाडीला धक्का देत भाजपने या निवडणुकीत बाजी मारली होती याचे सूत्रधार भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे असल्याचं बोललं जातंय त्यामुळे आता सुजय विखे यांच्या विरोधात महाविकास आघाडी पुढील काळात संघर्ष यात्रेद्वारे प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण हे नातेवाईकांच्या गराड्यात अडकले आहे. राजकीय कट्टर विरोधक हे एकमेकांचे नातेवाईक आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात नगरच्या राजकारणात चर्चा होत असते. याचाच फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांना बसलाय.
त्यात भाजपकडे संख्याबळ नसतांना उमेदवार विजयी झाल्याने घुले अधिकच आक्रमक झाले आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचे एकूण पाच मतं फुटल्याचे स्पष्ट होत असल्याने पक्षाने कारवाई करण्याची मागणी वरिष्ठ पातळीवर केली गेली आहे. त्यामुळे आता कुणाची पक्षातून हकालपट्टी होणार याकडे लक्ष लागून आहे.