‘या’ एका कारणासाठी तरी शरद पवारांनी मोदींसोबत यायला हवं होतं; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
Ramdas Athawale on Sharad Pawar and PM Narendra Modi : किमान आतातरी शरद पवारांनी मोदींच्या विरोधात भूमिका घेऊ नये, असं रामदास आठवले यांनी का म्हटलं? शिर्डीत साईंचं दर्शन घेतल्यानंतर आठवलेंनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा आठवले नेमकं काय म्हणाले? वाचा...

मनोज गाडेकर, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, शिर्डी, अहमदनगर | 04 जानेवारी 2024 : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज शिर्डीत जात साईबाबांचं दर्शन घेतलं. शिर्डी दौऱ्यावर आले असता रामदास आठवले साईंचरणी नतमस्तक झाले. साईबाबा संस्थानच्या वतीने आठवले यांचा सत्कार करण्यात आला. तेव्हा आठवलेंनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवरही रामदास आठवले यांनी भाष्य केलं. लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छाही रामदास आठवलेंनी बोलून दाखवली. शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढण्यात आपण तयार असल्याचं रामदास आठवले म्हणालेत.
“पवारांनी मोदींसोबत यायला हवं होतं”
देशाच्या विकासासाठी शरद पवारांनी मोदींच्या सोबत यायला हवं होतं. भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय 2014 ला राष्ट्रवादीने घेतला होता. आता शरद पवारांनी मोदींच्या विरोधात भूमिका घेणं योग्य नाही. त्यांनी भाजप सोबत येण्याचा निर्णय घेतला असता तर त्यांचाही पक्ष फुटला नसता. आम्ही त्यांना फोडले नाही तर आमदार आमच्याकडे आले. प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पक्ष फोडल्याचा आरोप अत्यंत चुकीचा आहे, असं रामदास आठवले म्हणाले.
विरोधकांना टीका करण्यापलीकडे काही उद्योग नाही. नरेंद्र मोदींच्या विरोधात जेवढं बोलतील तेवढा मोदींना फायदा होतोय. नरेंद्र मोदी सर्व धर्मियांना न्याय देणारे आहेत, असं रामदास आठवले म्हणाले.
रामदास आठवले म्हणाले…
साईंच्या दर्शनाबाबतही आठवले यांनी भाष्य केलं. लोकसभेसाठी मी साई बाबांच्या दर्शनाला आलो नाही. मी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे. सर्वधर्म समभावाची भूमिका घेणारा मी कार्यकर्ता आहे. मला हिंदू धर्माचे लोक जिथे बोलावतात मी तिथे जातो. सर्व धर्मियांनी गुण्या गोविंदाने राहावं, ही बाबासाहेबांची इच्छा होती. तसंच जगण्याचा मी प्रयत्न करतो, असं रामदास आठवले म्हणाले.
‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा
संधी मिळावी तर शिर्डी लोकसभा लढण्यास मी इच्छुक आहे. लोकसभेत संधी मिळाली तर पुन्हा मंत्रिपद नक्की मिळेल. संधी मिळाली तर या भागाचा विकास करणार आहे. मी लोकसभेचा माणूस आहे. 2009 साली शिर्डीत काही गैरसमजातून माझा पराभव झाला. मात्र आता मी केंद्रात मंत्री आहे.पुन्हा शिर्डी लोकसभा लढवावी यासाठी अनेक लोक आग्रही आहेत, असं आठवलेंनी म्हटलं.