मोठी बातमी! शिंदे गटात गृहकलह; खासदार विरोधात पक्षातच नाराजी, पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात पक्षातच नाराजी असल्याचं समोर आलंय. शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. गेल्या 10 वर्षात कोणतंही काम न करणारा खासदार पुन्हा नको, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतलीय.
अहमदनगर | 12 मार्च 2024 : महायुतीत जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असताना आता शिवसेना शिंदे गटातली धुसफूस समोर आली आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून एकीकडे जागावाटपाबाबतचा तिढा सुटताना दिसत नाहीय. तर दुसरीकडे शिर्डीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातच मोठी धुसफूस असल्याचं समोर येत आहे. विशेष म्हणजे गेल्या 10 वर्षांपासून खासदार असलेल्या नेत्यावर पक्षातील नेते आणि पदाधिकारी नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. याच नाराजीतून शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. गेल्या 10 वर्षात कोणतंही काम न करणारा खासदार पुन्हा नको, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतलीय.
गेल्या 10 वर्षांपासून शिर्डी लोकसभेचे खासदार असलेल्या सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात स्वपक्षीयांनीच रणशिंग फुंकलं आहे. मतदारसंघात कोणतेही ठोस कामे केली नाहीत. पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं नाही. त्यामुळे आम्ही जनतेला काय उत्तर द्यायचं? असा सवाल करत तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. शिर्डीत आज शिंदे गटाच्या संपर्क कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली आणी सामुहीक राजीनामे दिले आहेत.
लोखंडे दोनदा खासदार, पण…
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात आजवरची निवडणूक कधीही विकासाच्या मुद्यावर झाली नाही. केवळ जातीय समिकरण आणि पक्ष बदलामुळे झालेली नाराजी यातून लोखंडे दोनदा खासदार झाले. मात्र शिर्डीचा कोणताही विकास त्यांनी केला नसल्याची खंत शिवसेनेचे पदाधिकारी बोलून दाखवत आहेत. दुसरीकडे मतदारसंघातील जनताही लोखंडे यांच्यावर नाराज आहे. त्यामुळे त्यांना परत उमेदवारी दिली तर पराभवाला सामोरे जावं लागू शकतं. ही जागा भाजपला द्यावी, अशी मागणी होत असताना शिवसेना शिंदे गटातील नाराजी देखील आज समोर आली आहे.