शिर्डी | 3 जानेवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचं शिर्डीत दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिरमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. “राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी होता. त्याने 14 वर्ष वनवास भोगला होता. मग ते शाकाहारी कसे असू शकतात?”, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. “शिकार करून खाणारा राम आमचा आहे. आम्ही आज मटण खातो. राम बहुजनांचा आहे. आम्ही रामाच्या पावलावर चालतो. १४ वर्ष जंगलात काय खाणार?”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दलही मोठा दावा केला. “गांधीजी यांचं नेतृत्व यांना फार अगोदर पासून मान्य नव्हतं. त्यांच्यावर 1947 साली हल्ला झाला नव्हता, त्यांच्यावर 1935 आणि 1937 ला सुद्धा हल्ला झाला होता. कारण तर गांधी हे बनिया होते, म्हणजे ओबीसी होते आणि ओबीसींचं नेतृत्व हे त्यावेळीस सुद्धा मान्य नव्हतं”, असा मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलं.
“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा जबरदस्तीने घेतला होता. पक्ष ताब्यात घेऊन त्यांना भाजपला द्यायचा होता. पण शरद पवारांचा राजीनामा रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. यामुळे त्यांचा आमच्यावर प्रचंड राग आहे. पण मला उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून काही नकोय”, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगड येथे केलेल्या वक्तव्यावरही जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं. “आपण धर्म मानत नव्हतो. मशिदी समोर उन्माद न करणे हे हिंदू होते. आता मशीद आली की धाड धाड नाचतात. मुख्यमंत्र्यांना मलंग गडावरील भाषण शोभत नाही. मी त्या माणसाला ओळखतो. त्यांचा तोंडातून ते शोभत नाही. त्यांना ही स्क्रिप्ट कोणीतरी दिली आहे. कारण वातावरण बिघडवायचं आहे. याची सुरुवात मुख्यमंत्र्यांपासून झालीय. कारण मुख्यमंत्री बोलले की सगळं स्पष्ट होते”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचं काम हे मुख्यमंत्री करत आहेत. त्यामुळे त्यानी आपलं बोलणं थांबवलं पाहिजे. महाराष्ट्रात किती कंपन्या सुरू आहेत? बेरोजगारी मोठी वाढली आहे आणि सगळ्या सरकारी कंपन्या सुद्धा खाजगी होत आहेत. मग आरक्षणाचा फायदा काय? शाळांच्या खाजगीकरणामुळे कुणाचं भल होणार आहे? शिक्षण हे क्रांतीकारी शस्त्र आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“मला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारायचा आहे की, ज्यावेळी मंडल विरूद्ध कमंडल यात्रा निघाली त्यावेळी तूम्ही काय चाकावर बसला होता?”, असं आव्हाड म्हणाले. “शाहू महाराजांची हत्या करण्याचा कुणी कट रचला होता? आंबेडकर यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार कुणी केला हे पाहायला हवं. शेवटी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपले हक्क आपल्याला दिले”, असं देखील आव्हाड म्हणाले.
“ट्रकवाल्यांनी काल विरोध केला की हे घाबरले आणि निर्णय मागे घेतला. तुम्ही रस्त्यावर उतरून विरोध करायला का घाबरत आहात? जनतेच्या मनात जायचं असेल तर तुम्हाला तुम्ही शरद पवार यांच्यासोबत आहात हे तुम्हाला दाखवायला हवं”, असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलं. “एकएकाला 400 कोटी रुपये निधी दिला. आम्हाला फक्त यांनी दरवेळेला गप रे, गप रे म्हणून आमच्यावर ओरडले. पण आम्ही का गप्प बसायचं?”, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.
“सात ते आठ जण यांच्यासाठी आपण भाजप मध्ये जायचं का? मी सगळ्यात जास्त विरोध केला आणि शरद पवार यांना राजीनामा देऊ दिला नाही. मला त्याचा अभिमान आहे. माझ्यावर त्या सर्वांचा जास्त राग आहे. मात्र मी त्याला घाबरत नाही”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.