अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया संपूनदेखील प्रशासनावरील आरोप मात्र थांबत नाहीयत. निवडणुकीच्या दरम्यान माविआचे उमेदवार निलेश लंके आणि भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यात चांगलंच राजकारण तापलं होतं. यादरम्यान निलेश लंके यांनी प्रशासनावर वेळोवेळी आरोप केले. विशेष म्हणजे निलेश लंके यांचे मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर देखील आरोप सुरूच आहेत. निलेश लंके यांनी आज सकाळी एका व्यक्तीचा व्हिडीओ ट्विट करत ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवण्यात आले आहे, त्या ठिकाणी एक व्यक्ती फिरत असल्याचं म्हटलं होत. तर तो सीसीटीव्हीमध्ये छेडछाड करत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
घडलेल्या घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी निलेश लंके यांनी चर्चा केल्याचं म्हटलंय. तर रात्री त्यांनाही कोण व्यक्ती आहे हे माहित नव्हतं, या सर्व प्रकाराबाबत आपण रितसर तक्रार करणार असल्याचं निलेश लंके यांनी सांगितल आहे. तसेच सदर व्यक्ती आत जाते पण बंदोबस्तावर असलेल्या थोडक्यात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस यंत्रणेलाच याची माहिती नाही, असं ट्विट लंके यांनी केलं होतं.
निलेश लंके यांनी ट्विट केलेला व्हिडीओ आणि घेतलेल्या आक्षेपावर अहमदनगरचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी स्पष्टीकरण दिलंय. निलेश लंके यांनी केलेलं ट्विट हे अपुऱ्या माहितीवरून केले असल्याचं जिल्हाधिकारी यांनी म्हटलंय. सीसीटीव्हीची वायर दुरुस्त करण्यासाठी ओळखपत्र देऊन कर्मचारी गेला होता. तर ज्या ठिकाणी मतदान साहित्य आहे त्या ठिकाणी तीन पद्धतीची सुरक्षा असल्याचे त्यांनी म्हटलंय. सीसीटीव्हीची वायर लीक झाल्याचं लक्षात आल्याने जे वेंडर कर्मचारी आहेत त्यांना आम्ही ओळखपत्र देऊनच दुरूस्तीसाठी पाठवल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितलं आहे.
येत्या 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र त्याआधी नगर दक्षिण मतदारसंघाचे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याच पाहायला मिळालंय. या निवडणुकीदरम्यान अनेक आरोप-प्रत्यारोप लंके आणि विखें यांच्यामध्ये झाले. तर यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा देखील आरोप लंके यांनी केला होता. मात्र 4 जून रोजी या सर्व आरोप-प्रत्यारोपांचा काय निकाल लागणार? याकडे संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे.