निलेश लंके यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू, कार्यकर्त्यांसमोर भावूक, आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके आज आपल्या कार्यकर्त्यांसमोर अक्षरश: रडले. त्यांनी आज आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी जनतेची आणि कार्यकर्त्यांची माफी मागितली. आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण व्हायला सहा महिने शिल्लक असताना आपण राजीनामा देतोय याचं वाईट वाटतंय. पण आपल्याला दिल्लीत जावून भूमिका मांडायची आहे. काम करायचं आहे. त्यासाठी आपल्याला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल, अशी भूमिका निलेश लंके यांनी मांडली. यावेळी ते प्रचंड भावूक झाले. त्यांना पारनेरच्या नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची माफी मागितली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांसमोर सविस्तर भूमिका मांडली. निलेश लंके लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे ते आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांसमोर भूमिका मांडताना निलेश लंके यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. ते भावूक झाले. दिल्लीत लोकसभेत शेतकऱ्यांचं म्हणणं मांडण्यासाठी आपण जायला हवं. त्यामुळे मी आज विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतोय. मी माझा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना पाठवणार आहे, असं निलेश लंके म्हणाले. यावेळी निलेश लंके यांनी राजीनामा वाचून दाखवला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात आपण लोकसभा निवडणुकीला सामोरं जाऊ, असं निलेश लंके यांनी जाहीर केलं.
“आता शिवधनुष्य हाती घेतलं आहे. मी अजित पवारांची माफी मागतो. आता मला माफ करा. मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. आता आपल्याला कायदेशीर अडकायचं नाही. आता आपण अभिमन्यू आहोत. आपण चक्रवादळात अडकलो आहोत. तुम्ही मला पाच वर्षांसाठी निवडून दिलं. मात्र आता साडेचार वर्षे झाली आहेत. मला पाच वर्षांसाठी निवडून दिलं आहे. मात्र मी तुम्हाला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. आता आपल्याला ठोस निर्णय घ्यावा लागेल. चार महिने कमी असताना आपल्याला कटू निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा मी म्हणालो माझ्या लोकांना विचारू द्या”, असं निलेश लंके कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.
…आणि निलेश लंके यांच्या भावनांचा बांध फुटला
“आपल्याला लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा द्यावा लागेल”, असं निलेश लंके म्हणाले आणि त्यांच्या भावनांचा बांध फुटला. ते प्रचंड भावूक झाले. त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला सावरलं. “आपल्याला लढायचे आहे. रडायचं नाही. या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. आपल्याला आता विधानसभा पदाचा राजीनामा द्यावा लागेल. आपण आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे पाठवत आहोत”, असं निलेश लंके यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.
निलेश लंके यांचा शरद पवार गटात प्रवेश
निलेश लंके यांनी यावेळी मोठी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात आपल्याला लोकसभा निवडणूक लढायची आहे, असं निलेश लंके म्हणाले. यावेळी निलेश लंके यांनी अधिकृतपणे शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांनी शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाचा फोटो आपल्या हातात घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
‘अजित पवार राजकारणात राहिले पाहिजेत’
यावेळी निलेश लंके यांनी अजित पवार यांच्याबद्दलही भावना व्यक्त केल्या. “अनेक लोकांनी सांगितले आम्ही तुमच्यासोबत, तर अनेक जेष्ठ लोक मला येऊन भेटले. तालुक्याचे राजकारण कसंही असू द्या. मात्र आम्ही तुमच्या बाजूने, असं म्हणाले. मी आमदार झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. नंतर कोविड आला. अनेक जण मला म्हणाले होते तुम्ही गुहाटीला गेले का? आम्ही अजित दादांसोबत गेलो. छातीवर दगड ठेऊन निर्णय घेतला. मी आमदार असू नाहीतर नसो. मात्र अजित पवार राजकारणात राहिले पाहिजेत”, अशी भूमिका निलेश लंके यांनी मांडली.