नाट्यमय घडामोडींनंतर अखेर निलेश लंके माध्यमांसमोर, अजित पवारांना सोडून शरद पवारांची साथ धरणार?
पारनेरचे आमदार निलेश लंके हे शरद पवार गटात आज पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा असतानाच या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला. निलेश लंके माध्यमांसमोर आले. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अमोल कोल्हे यांच्या भेटीमागचं कारण सांगत आपली भूमिका मांडली.
अहमदनगर | 11 मार्च 2024 : राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटात प्रवेश करतील, अशी चर्चा सध्या सुरु असताना एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. निलेश लंके यांनी स्वत: माध्यमांना प्रतिक्रिया देताना आपण शरद पवार गटात जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. निलेश लंके आणि शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. त्यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले आहेत. त्यामुळे निलेश लंके शरद पवार गटात जातील आणि लोकसभेच्या अहमदनगर जागेवरुन निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरु झाली. याबाबतच्या चर्चा सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी निलेश लंके यांना शरद पवार गटात न जाण्याचं भावनिक आवाहन केलं. दुसरीकडे शरद पवार यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी तसं काही नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर आता निलेश लंके यांना ऑनलाईन पद्धतीने माध्यमांसमोर येऊन आपण अजित पवार गटातच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
“माझा अद्याप निर्णय झालेला नाही. मी शरद पवारांसोबत जाण्याच्या बातमीत काही सत्यता नाही”, अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली आहे. “मी गोळ्या औषधी घेण्यासाठी गेस्ट हाऊला गेलो. तिथे अमोल कोल्हे आम्हाला त्या ठिकाणी भेटले. त्यावेळी त्यांच्या महानाट्याच्या नाटकाविषयी चर्चा झाली. दुसरी कोणतीही चर्चा झाली नाही. माझ्या पत्रकार परिषदेआधी बातमी आली की निलेश लंके थोड्याच वेळात शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार. पण मलाच माहिती नाही. प्रवेश करणारा मी असल्यामुळे मलातरी माहिती हवं ना? आता मला कुणीतरी शरद पवारांची पत्रकार परिषद दाखवली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की या गोष्टीत तथ्य नाही”, अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली. यावेळी निलेश लंके यांनी अमोल कोल्हे यांच्या भेटीबाबत प्रतिक्रिया दिली. “अमोल कोल्हे यांचं महानाट्य ठेवलं होतं. ते योगायोगाने तिथे मुक्कामी होते. तिथे आमची भेट झाली”, असं निलेश लंके यांनी सांगितलं.
निलेश लंके यांच्याबाबत सातत्याने चर्चा सुरु
निलेश लंके हे पारनेरचे आमदार आहेत. ते कोरोना काळात प्रचंड प्रसिद्धीस आले होते. कारण त्यांनी कोरोना काळात आपल्या मतदारसंघात भव्य कोविड सेंटर उभारलं होतं. त्यांनी लाखो रुग्णांची मनोभावे सेवा केली होती. त्यामुळे लाखो रुग्णांची प्रकृती सुधारली, अनेकांना वेळेवर उपचार मिळाले. त्यामुळे अनेकांचे प्राण बचावले. निलेश लंके यांनी केलेल्या या कामांमुळे ते अहमदनगरसह राज्यभरात प्रसिद्ध झाले. त्यांची लोकप्रियता वाढली. याच लोकप्रियेतेचा फायदा त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो.
निलेश लंके अहमदनगर लोकसभेच्या जागेवर उभे राहीले तर ते जिंकून येऊ शकतात. पण ते अजित पवार गटाच्या की शरद पवार गटाच्या तिकीटावर निवडणूक लढवतील, याबाबत संभ्रम निर्माण झालाय. अजित पवारांनी वेगळी भूमिका घेत सरकारमध्ये सहभागी होण्यााच निर्णय घेतला तेव्हा निलेश लंके यांनी अजित पवारांना पाठिंबा दर्शवला होता. पण लोकसभेच्या जागावाटपाबाबत महायुतीत सुरु असलेल्या घडामोडी पाहता लंके पुन्हा शरद पवारांची साथ धरणार, अशी चर्चा सुरु होती. पण आपण तसा काही निर्णय घेतला नसल्याचं लंके यांनी स्पष्ट केलं.