‘रावणाच्या अहंकाराचाही नाश झाला, तर तुम्ही कोण?’, राजीनाम्याच्या घोषणेआधी निलेश लंकेंचा कुणावर निशाणा?
"त्यांच्या बगलबच्चांना सांगा. तुझ्या साहेबाला फोन लाव मी माझ्या निलेश लंकेला फोन लावतो. आपण 365 दिवस काम करणारे माणसं. आम्हाला एकदा-दोनदा डिवचलं. मात्र आम्ही पण स्वाभिमान आहोत. मी माझ्या छातीवरचा वार घेऊ शकतो. मात्र कार्यकर्त्यांचे नाही. कोणी काही बोलू द्या. कमीत कमी दोन लाख मतांनी निवडून येणार", अशा शब्दांत आमदार निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी भाजप खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. निलेश लंके यांनी आज त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीवेळी निलेश लंके यांनी भूमिका मांडली. यावेळी निलेश लंकेंनी विखे पाटलांवर नाव न घेता निशाणा केली. “रावणाचा देखील नाश झाला आहे, अहंकाराचा नाश झाला तर तुम्ही कोण? दिवा फडफड करत आहे. तुमच्याकडे यंत्रणा आहे. मात्र आमच्याकडे जीवाभावाचे मावळे आहेत. मी आयुष्यात पैसे कमवले नाहीत. लाख मोलाची माणसं कमावले आहेत. त्यांची किंमत होऊ शकत नाही. मला माझं साम्राज्य टिकण्यासाठी राजकारण करायचं नाही. मला जिरवा जिरवीचं राजकारण करायचं नाही. लोकांचं काम करण्यासाठी मला काम करायचं आहे. मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. तुम्हाला इतका घाम फुटण्याची गरज काय?”, असा सवाल निलेश लंके यांनी केला.
“मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना खूप त्रास दिला. जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम केले. पालकमंत्री झाल्यावर जास्त चांगलं काम नाही तर वाईट काम केलं. सर्वात जास्त पारनेर तालुक्यात त्रास देण्याचं काम केलं. व्यक्तिगत जीवनात देखील त्रास देण्याचं काम केलं. मी निवडून आल्यावर देखील अनेक लोक म्हणाले, याची जिरवू त्याची जिरवू. मात्र मी म्हणालो आपण आता सर्व तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहोत”, असं निलेश लंके म्हणाले.
‘चुकीच्या पद्धतीने त्रास दिला’
“चुकीच्या पद्धतीने लोकांनी आपल्याला त्रास दिला. मात्र आपण त्रास द्यायचा नाही. आरेला कारे करण्याची ताकद आमच्यात आहे. कोणी शिक्षक माझ्यासोबत फिरला तर त्याला निलंबित करायचं, शिवपुत्र संभाजी महानाट्याला सुट्टीवर असणाऱ्या पोलिसाला निलंबित केले”, असा दावा निलेश लंके यांनी केला.
“अनेक आश्वासन दिले. मात्र एकही योजना आली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे गेले आणि तिकीट द्या विनंती केली. मात्र त्यांना कोणीतरी सांगितलं असेल कांदा निर्यात बंदी उठणार आहे. तर लगेच अनेक आश्वासन दिले. मात्र एकही योजना आली नाही. आम्ही जे बोलतो तेच करतो, दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करणारे आम्ही नाही”, असं निलेश लंके म्हणाले.
‘पारनेरकरांच्या अस्तित्वाची लढाई, दगाफटका झाला तर…’
“तुमच्या दडपशाही आणि दादागिरीला कोणी भीक घालणार नाही. तुमचे चमचे आणि तुम्ही येत्या 13 तारखेला घरी पोहोचल्याशिवाय राहणार नाहीत. आता सर्वसामान्यांनी शांत बसायला नको. मी सर्वसामान्य कुटुंबातील घरात जन्माला आलो. तुमच्या पीएने तर 15 टक्क्याने पैसे गोळा केले. मला लोक विचारतात. तुम्हाला पीए कोण? मी सांगतो मीच माझा पीए. माझ्यात काही बदल झाला का?”, असं निलेश लंके म्हणाले.
“पारनेरकरांच्या अस्तित्वाची लढाई आहे, जर काही दगाफटका झाला तर सर्वसामान्यांच्या अस्तित्वात धक्का बसेल. लोकसभेचा उमेदवार उत्तरेचा, मात्र मी तुमच्या घरातला आहे ना? त्यांना सांगा पैसे घेऊन जा. आता तुम्ही सर्वांनी पुढे या. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला निवडणूक जिंकायची आहे. तुमच्याकडे पैसे तर आमच्याकडे लोक आहेत”, असं निलेश लंके म्हणाले.
‘दोन लाख मतांनी निवडून येणार’
“त्यांच्या बगलबच्चांना सांगा. तुझ्या साहेबाला फोन लाव मी माझ्या निलेश लंकेला फोन लावतो. आपण 365 दिवस काम करणारे माणसं. आम्हाला एकदा-दोनदा डिवचलं. मात्र आम्ही पण स्वाभिमान आहोत. मी माझ्या छातीवरचा वार घेऊ शकतो. मात्र कार्यकर्त्यांचे नाही. कोणी काही बोलू द्या. कमीत कमी दोन लाख मतांनी निवडून येणार. शिवसेनेना आणि काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना जाऊन भेटा, कोणी दुखावल गेले असती तर सांगा पदरात घ्या”, असं निलेश लंके म्हणाले.
“आज ते गोड गोड बोलतील. मात्र उद्या विचारणार देखील नाही. हे मोठे लोक आहे. पुन्हा पाच वर्ष ते फिरणार नाही. ते हिलेकॉप्टरमध्ये फिरतात. माझ्या गाडीचं डिझेल कार्यकर्ते टाकतात. अनेक लोक म्हणतात आमचं पाकीट येऊ द्या. मग आम्ही तुमच्या तंबूत. निलेश लंके मॅनेज होणारी अवलाद नाहीय मॅनेज हा तुमचा शब्द. 4 तारखेला लोक सांगतील डॉन कोण”, असं निलेश लंके म्हणाले.
“तुम्ही नगर दक्षिणचे खासदार, मात्र संरक्षण मंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री, शासन आपल्या दारी, पशुसंवर्धनचे मोठे प्रदर्शन घेतलं, हे सगळे कार्यक्रम उत्तरला घेतले. तुम्हाला नगर दक्षिणच्या लोकांनी निवडून दिले. मात्र तुम्ही निधी उत्तरेला नेला. माझं काम वाढवलं होतं. अधिकारी म्हणाला मोठ्या साहेबांना प्रेझेंटेशन दाखवा. मी कलेक्टरला फोन लावला. माझ्या स्टाईलने बोललो. लगेच काम मंजूर झालं. लोक म्हणतात, मला इंग्रजी येत नाही. मात्र दिल्लीला गेल्यावर बघा कसं फाडफाड इंग्लिश बोलतो”, असं निलेश लंके यावेळी म्हणाले.