‘वारकरी संप्रदायाचे वैभव बाबा महाराज सातारकर हरपले’, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण
ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं आज निधन झालं. सातारकर यांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बाबा महाराज यांनी कीर्तनातून समाजप्रबोधनाचं खूप मोठं काम केलं. बाबा महाराज यांच्या निधनाच्या वृत्तावर अनेकांकडून दु:ख व्यक्त केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाच्या वृत्तावर दु:ख व्यक्त केलंय.
शिर्डी | 26 ऑक्टोबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या हस्ते आज हजारो कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण झालं. यावेळी त्यांनी विविध विकासकामांविषयी माहिती दिली. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली वाहिली. प्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं आज वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बाबा महाराज यांच्याशी शेकडो विठ्ठल भक्तांचं भावनिक नातं होतं. त्यामुळे वारकरी संप्रदायातील अनेक दिग्गजांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलंय. बाबा महाराज यांचं निधन होणं ही खरंच खूप मोठी पोकळी निर्माण होणारी घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा या घटनेवर दु:ख व्यक्त केलंय.
“मला आज सकाळीच देशाचे एक अनमोल रत्न वारकरी संप्रदायाचे वैभव ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाची बातमी समजली. बाबा महाराजांनी कीर्तन, प्रवचनच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं जे काम केलं ते कित्येक पिढ्यांना प्रेरणा देणारं आहे. त्यांची बोलण्यातील सहजता, त्यांची प्रेमळ वाणी, त्यांची बोलण्याची शैली मनाला खूप स्पर्श करायची. ते जय जय रामकृष्ण हरी भजन गायचे तेव्हा त्याचा प्रभाव काय व्हायचा ते आम्ही पाहिलं आहे . मी बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
मोदींची छत्रपती शिवरायांना वंदन करुन भाषणाला सुरुवात
नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केलं. “छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार नमस्कार. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्र आणि राज्य सरकारचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विशाल संख्येने आलेल्या सर्व माझ्या कुटुंबियांना नमस्कार. शिर्डीच्या या पावनभूमीला माझे कोटी कोटी नमन”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
7500 कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण
“पाच वर्षांपूर्वी या पवित्र मंदिराला 100 वर्ष पूर्ण झाले होते. तेव्हा मला साई दर्शनाची संधी मिळाली होती. आज इथे साईबाबांच्या आशीर्वादाने 7500 कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण झालंय. महाराष्ट्राला पाच दशकांपासून ज्या निलवंडे धरणाची प्रतिक्षा होती ते काम पूर्ण झालंय. मला आज तिथे जलपूजन करण्याचं भाग्य मिळालं आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
मोदींकडून सरकारी योजनांची माहिती
“देशाला गरिबीपासून मुक्ती मिळावी, गरिबातून गरीब कुटुंबाला प्रगतीसाठी संधी मिळावी हाच खरा सामाजिक न्याय आहे. आमचं सरकार सर्वाचा साथ आणि सर्वाच्या विकास या विचारधारेचं आहे. आमच्या डबल इंजिन सरकारची सर्वात पहिली प्राथमिकता ही गरीबांच्या कल्याणाची आहे. देशाची अर्थव्यवस्था आज वाढत आहे तेव्हा गरीब कल्याणासाठी सरकारचा बजेटही वाढत आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“महाराष्ट्रात आज 1 कोटी 10 लाख आयुषमान कार्ड दिले जात आहेत. अशा सर्व कार्डधारकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची गॅरंटी आहे. आयुषमान भारत योजनेअंतर्गत गरिबांना मोफत उपचार देऊन देशाने 70 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. गरिबांना मोफत अन्नधान्यच्या योजनेवर देशाने 4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केलाय. गरिबांचं घर बनवण्यासाठी सरकारने 4 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत”, असं मोदी यावेळी म्हणाले.