Sanjay Raut | 400 जागा जिंकणार म्हणता, मग आम्हाला घाबरता कशाला, संजय राऊत यांचा टोला
Sanjay Raut | भाजपाला जर 400 जागा जिंकण्याचा आत्मविश्वास आहे तर मग हे सरकार शिवसेना, राहुल गांधी यांना का घाबरत आहे, असा खोचक सवाल खासदर संजय राऊत यांनी विचारला आहे. राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेत अडथळे आणल्या जात आहेत, यातच सर्व आल्याचे जणू त्यांनी मांडले.
अहमदनगर | 28 January 2024 : भाजप देशात लोकसभेच्या 400 जागा जिंकण्याचा दावा करत आहे. ‘अब की बार, 400 पार’, असा नारा देणारे आता घाबरत आहेत. मग भाजप राहुल गांधी आणि महाराष्ट्रात शिवसेनेला का घाबरत आहे, असा भीमटोला खासदार संजय राऊत यांनी हाणला. राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेत कशासाठी अडथळे आणल्या जात आहे. भाजपने आता घाबरायचे कारण नाही, त्यांनी आमचा सामना करावा. मुकाबला करावा असे आव्हान त्यांनी भाजपला दिले. त्यामुळे येत्या काळात राज्यात विरोधाला धार चढेल असे चित्र दिसते.
राहुल गांधी यांच्या यात्रेत अडथळे
भाजप जर घाबरत नसेल तर राहुल गांधी यांच्या यात्रेत अडथळे का आणल्या जात आहेत, असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधी यांची न्याय यात्रा मणिपूर, आसाम अशी पुढे पुढे जात आहे. पण भाजप राहुल गांधी आणि राज्यात शिवसेनेला घाबरत आहे. आता त्यांनी घाबरु नये, सामना करावा, असा आव्हान त्यांनी दिले.
नितीश कुमार यांच्यावर टीका
महाविकास आघाडीची परिस्थिती उत्तम आहे. नितीश कुमार यांचे मानसिक स्वास्थ्य ठीक नाही. नितीश कुमार आमच्यापासून दूर गेले तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही, असा टोला त्यांनी हाणला. नितीश कुमार यांनी थोड्यावेळापूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
गुंडांचे राज्य आले
अहमदनगरमध्ये गुंडांच राज्य सुरू झालंय, हे गुंड आता सरकारमध्ये सहभागी झाले आहे.. नाव न घेता संजय राऊत यांनी संग्राम जगताप यांच्यावर टीका केली आहे. आमच्या मुंबईत दाऊदच्या गँग मोकळ्या जागेवर ताबे मारायचे, तशा प्रकारच्या जमिनीवर ताबा मारण्याचे प्रकार घडत असल्याचे मी ऐकल्याचे ते म्हणाले. ही परिस्थिती एखाद्या पक्षाच्या आमदारामुळे होत असेल तर राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत, असा टोला त्यांनी हाणला. नगर मध्ये देवस्थानच्या जागा लुटल्या गेल्या आहेत. शैक्षणिक संकुलाच्या जागा इकडेच आमदार लुटत आहेत. त्यांनी निदान देवस्थानच्या जागा तरी सोडायला हव्यात, असा राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांच्यावर त्यांनी जोरावर हल्लाबोल केला.
फसवणूक झाली की नाही ते सांगा
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची फसवणूक झाली असेल तर स्वतः सांगावं. त्यांनी मुख्यमंत्र्यांना कडकडून मिठी मारली आता त्यांनीच सांगावं की फसवणूक झाली की नाही, असे ते म्हणाले. ओबीसी समाज नाराज असल्याच्या प्रश्नावर कुणाचे ओरबाडून कुणाला देऊ नका, असे ते म्हणाले.