Aishwarya Mishra : एशियन गेममध्ये ऐश्वर्या मिश्रा चमकली, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला अपेक्षाभंग, कारण काय तर…
एशियन गेममध्ये रौप्य पदक पटकावले. भारतात येऊन चार दिवस झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घ्यायची होती. पण, त्यांची भेट झाली नाही. माझा अपेक्षाभंग झाला. दोन दिवस आराम करून पुढील तयारीला सुरवात करायची होती, पण....
ठाणे : 13 ऑक्टोबर 2023 | चीनमधील हांगझोऊ येथे एशियन गेम 2023 च्या 14 व्या दिवशी ऐश्वर्या मिश्रा हिने 4 × 400 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले. तिच्या या कामगिरीमुळे कुटुंबाचे तसेच संपूर्ण देशाचे नाव उंचावले. ऐश्वर्या मिश्रा हिचे वडील कैलाश मिश्रा हे मुंबईतील दहिसर भागात फळ आणि भाजीपाल्याचे छोटेसे दुकान चालवतात. दहा बाय दहाच्या घरात कुटुंबासोबत ऐश्वर्या मिश्रा राहते. भाजीपाला विक्री करून तिचे वडील आपल्या घराची उपजीविका भागवतात. भाजीपाला विक्रीमधून मिळणाऱ्या पैशातून ते गेली बारा वर्ष ऐश्वर्याला विविध गेममध्ये खेळण्यास प्रोत्साहन देत आहेत. एशियन गेममध्ये ऐश्वर्या मिश्रा हिने पदक पटकावले. महाराष्ट्रात परत आल्यानंतर तिचे ठिकठिकाणी स्वागत झाले. अनेक सत्कार झाले. ऐश्वर्या मिश्रा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेली. पण, यावेळी अपेक्षाभंग झाला, असे ती म्हणाली.
दसरा मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यासह मुंबईतील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. ही बैठक सुरू असताना एशियन गेममध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या खेळाडूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याची इच्छा दर्शवली. मात्र, मुख्यमंत्री शिंदे हे आजारी असल्याचे कारण त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे या खेळाडूंना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचे नाकारण्यात आले.
ऐश्वर्या मिश्रा हिने याबाबत आपली जाहीर नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेलो पण ते आजारी असल्याचे सांगून आमची भेट नाकारण्यात आली. त्यामुळे आमचा अपेक्षाभंग झाला असे ती म्हणाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एशियन गेममध्ये विविध पदके पटकाविल्याबद्दल एक लाख रुपये रोख रक्कमेचे बक्षीस जाहीर केले. या बक्षिसाबद्दलही ऐश्वर्या मिश्रा हिने महाराष्ट्र सरकारबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे.
ऐश्वर्या मिश्रा हिच्यासोबत अन्य राज्यातील काही खेळाडू एशियन गेम खेळण्यासाठी गेले होते. त्यांनीही चमकदार कामगिरी केली. त्यातील ऐश्वर्या मिश्रा हिच्या काही सहकाऱ्यांना त्यांच्या राज्यातील सरकारने सरकारी नोकरी दिली. त्यांचे कौतुक केले. त्याप्रमाणेच आपणासही महाराष्ट्र सरकारने सरकारी नोकरी देऊन कौतुक करावे अशी अपेक्षा ऐश्वर्या मिश्रा हिने व्यक्त केली आहे.