हालचाली वाढल्या, नव्या मंत्र्यांच्या शपथविधीनंतर आता खातेवाटप कधी?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर आता या नव्या सरकारचं खातेवाटप कधी होईल? याबाबतची उत्सुकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला आहे. नव्या सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडला आहे. महायुतीच्या मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात आज 39 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये तब्बल 25 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली बघायला मिळत आहे. महिला, तरुण, विविध समाज यांचा विचार करुन महायुती सरकारकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर आता खातेवाटप कधी होईल? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
“हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आम्ही सर्वजण आज नागपुरात आलो आहोत. मंत्रिमंडळ बैठक नुकतीच पार पडली. अलिकडे पायंडाच पडलेला आहे की, विरोधी पक्ष हा सातत्याने चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकतात. हे वर्षानुवर्षे अलिकडे चाललं आहे. त्यामुळे चहापान करावं की न करावं हा एक विचार करणारा प्रश्न आहे. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र पाठवलं आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे नेहमीचे काही दाखले देण्याचा प्रयत्न केला गेला आहे”, असं अजित पवार म्हणाले.
“महायुतीचं प्रचंड बहुमताने सरकार आलं आहे आणि आज त्याला खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन अंतिम स्वरुप प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन-तीन दिवसांत सर्वांचे खातेवाटप करतील आणि सर्वजण कामाला लागलेले असतील. आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे की, आमच्याकडे बहुमत असल्याने जनतेने दिलेला विश्वासाला पात्र राहून विकास कामे करु. तसेच विरोधकांची संख्या कमी असली तरी महाराष्ट्राच्या दृष्टीकोनाने महत्त्वाचे प्रश्न सभागृहात चर्चेला आले तर महाराष्ट्राच्या हिताने उत्तरे दिले जातील. विरोधकांनीदेखील त्या पद्धतीने प्रश्न मांडायचे असतात, साधकबाधक विचार करायचे असतात”, असंही अजित पवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीस खातेवाटपावर काय म्हणाले?
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील खातेवाटपावर प्रतिक्रिया दिली. “खातेवाटप येत्या दोन दिवसांत पूर्ण करु. जवळपास आमची सर्व क्लियारिटी झालेली आहे. या अधिवेशनात आपल्याला कल्पना आहे की, राज्यपालाच्या अभिवादनावर चर्चा, पुरवणी मागण्यांवरील चर्चा, सत्तारुढ आणि विरोधी पक्षांच्या प्रस्तावावरील चर्चा, त्याचबरोबर जवळपास 20 बिलं या अधिवेशात येणार आहे. त्यामुळे चांगलं कामकाज करण्याचा आमचा प्रयत्न आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.