दिल्लीत दोन्ही पवारांची भेट, महाराष्ट्रात चर्चांना उधाण
पवार आणि शरद पवार यांची आज दिल्लीत भेट झाली. शरद पवार यांचा आज 84 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त अजित पवारांनी कुटुंबीय आणि नेत्यांसह शरद पवारांची भेट घेतली. यावर प्रतिक्रिया देताना, आम्हाला अजित पवारांपासून धोका नाही असं शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले आहेत. पाहुयात..
शरद पवारांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी सह कुटुंब आणि पक्षाच्या नेत्यांनीही पवारांची भेट घेतली. विधानसभेच्या निकालानंतर आणि 6 व्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर वाढदिवसाच्या निमित्तानं अजित पवार पहिल्यांदाच, शरद पवारांना भेटलेत. संसदेचं अधिवेशन सुरु असल्यानं शरद पवार दिल्लीत आहेत. दिल्लीतल्या शरद पवारांच्या निवासस्थानी येताच, सुप्रिया सुळे अजित पवार आणि सुनेत्रा पवारांना घ्यायला आल्या. भाचा, पार्थ पवारांना सुप्रिया सुळेंनी जवळ घेत विचारपूस केल्याचं दृष्यांमध्ये दिसलं. जवळपास 20 मिनिटं भेट झाल्यानंतर, अजित पवारांनी आपण साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आल्याचं सांगत. दिल्लीतलं अधिवेशन आणि महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा झाल्याचं सांगितलं.
संजय शिरसाठ काय म्हणाले?
अजित पवारांसोबत, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. पण दोन्ही पवारांची भेट दिल्लीत झाली. मात्र, या भेटीनंतर शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते शिरसाटांच्या वक्तव्यानं वेगळीच चर्चा सुरु झाली. दोन्ही पवार एकत्र येणार असल्याचं जानकार म्हणतात असं शिरसाट म्हणाले.
राऊतांची टीका
दोन्ही पवार अर्थात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवाराचं महायुतीत वजन वाढेल अशीही चर्चा आहे. मात्र आम्हाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीपासून धोका नाही. त्यांच्यामुळं आमचं महत्व वाढलंही नाही आणि घटलंही नाही असं संजय शिरसाट म्हणाले. पण अजित पवारांची भेट, संजय राऊतांना काही आवडलेली दिसत नाही. काकाच्या पाठीत खंजीर खुपसून शुभेच्छा देण्यासाठी आले. मी तर नजरही मिळवू शकलो नसतो अशी टीका राऊतांनी केली.
अजित पवारांचा पुढाकार
अजित पवारांच्या बंडानंतर पवार कुटुंबातले संबंध ताणले गेले. विधानसभेच्या निवडणुका ऐन दिवाळीत आल्यानं, पहिल्यांदाच दिवाळी पाडवेही 2 ठिकाणी साजरे झाले. पाडव्यात एकमेकांसमोर येणंही टाळलं. पण आता निवडणुका संपताच अजित पवारांनीच पुढाकार घेत वाढदिवसानिमित्त शरद पवारांची भेट घेतली.
अजित पवारांच्या राजकारणातील वेगळ्या भूमिकेमुळं 2 राष्ट्रवादी झाल्या. राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असं असलं तरी भाजपसोबत जाणार नाही हे शरद पवारांनी वेळोवेळी स्पष्ट केलं आहे.