मोठी बातमी! शरद पवार, अजितदादा पुन्हा एकत्र येणार का? राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बड्या नेत्यानं सांगितली आतली गोष्ट
गुरुवारी शरद पवार यांचा वाढदिवस होता, अजित पवार यांनी शरद पवार यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्यानंतर पुन्हा एकदा अजितदादा आणि शरद पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
गुरुवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस होता. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास वीस मिनिट चर्चा झाली. ही चर्चा नेमकी कशावर झाली हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र शरद पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली, या भेटीनंतर पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? अशी चर्चा आता रंगताना पाहायला मिळत आहे. यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले अंकुश काकडे?
अजितदादांनी गुरुवारी पवार साहेबांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ही चांगली बाब आहे. पण त्याचा अर्थ दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असा लावला गेला. भविष्यात काय होईल सांगता येत नाही. कार्यकर्ते आणि काही प्रमुखांची इच्छा आहे, दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन काम करावे. तसेच झाल्यास आनंदाची गोष्ट असेल, असं अंकुश काकडे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, पण याचा अंतिम निर्णय पवार साहेब घेतील. पवार साहेबांनी निर्णय घेतला तर सगळेच एकत्र येतील अडचण राहणार नाही. पवार साहेबांनी जर निर्णय घेतला तर त्याला कोणताही कार्यकर्ता पदाधिकारी विरोध करेल असं वाटत नाही.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. अमोल मिटकरी यांना अकोल्यात कोण ओळखतं? पवार साहेब आणि अजितदादा यांनी एकत्र यावं अशी इच्छा राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेक नेत्यांची पदाधिकाऱ्यांची आहे. जर पवार साहेब आणि अजितदादा एकत्र आले तर अमोल मिटकरी आणि रूपाली पाटील यांची कुचंबना होणार आहे.चक्की पीसिंग म्हणणारे आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अजित दादांना आपल्या सोबत घेतात. एकमेकांवर केलेल्या टीकेला आज महत्त्व राहिलं नाही. काल केलेली टीका उद्या स्तुतिसुमने होऊ शकतात, असा टोला यावेळी काकडे यांनी लगावला आहे.