चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार, मृतांचा आकडा प्रचंड वाढला, विधानसभेत अजित पवार यांची शिंदे सरकारकडे महत्त्वाची मागणी
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चीनमध्ये हाहाकार उडाला आहे. कोरोना संसर्गाला आवरणं हे प्रशासनाच्या हाताबाहेर गेलंय. रुग्णालयांमध्ये बेड्स शिल्लक नाहीयत. अशा परिस्थितीत आता महाराष्ट्रात काय काळजी घेतली जातेय? असा प्रश्न अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला.
नागपूर: चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोकंवर काढलंय. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चीनमध्ये हाहाकार उडाला आहे. कोरोना संसर्गाला आवरणं हे प्रशासनाच्या हाताबाहेर गेलंय. रुग्णालयांमध्ये बेड्स शिल्लक नाहीयत. परिस्थिती सांभाळताना चीन सरकारच्या नाकीनऊ आलंय. चीनमधलं हे संकट भारतात येऊ नये यासाठी केंद्र सरकार सतर्क झालंय. विशेष म्हणजे या संकटाचे पडसाद आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहातही पडताना दिसले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घोंघावणाऱ्या या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला सवाल करत महत्त्वाची मागणी देखील केलीय.
गेल्या तीन वर्षात जगभरात ‘कोरोना’ने थैमान घातले आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन करावा लागला. या पार्श्वभूमीवर राज्यात काय खबरदारी, उपाययोजना केली जात आहे ? असा सवाल अजित पवारांनी केला.
‘कोरोना’ संकटाबाबतचा प्रशासनाला अनुभव आहे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोनाची परिस्थिती चांगल्याप्रकारे हाताळली होती. ‘कोराना’च्या नवीन व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असं अजित पवार सभागृहात म्हणाले.
राज्य सरकारने ‘कोरोना’चा विषय गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात आज केली. याला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या माध्यमातून तातडीने टास्क फोर्स उभारणार असल्याची माहिती दिली.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, “कोरोनाच्या काळात मार्च महिन्यात दुबईतून आलेल्या जोडप्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढला. चीन, जपान, कोरिया, ब्राझिल या देशांत कोरोनाचा नवीन व्हेरिएंट सापडत आहे आणि कोविडची साथ पुन्हा सुरू झाली आहे.”
“चीनमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. बेड शिल्लक नाहीत म्हणून तिथे कारमध्ये रुग्णांना अॅडमिट करण्याची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांनी काल नव्या व्हेरिएंटविषयी तपास आणि काळजी घेण्याचे आवाहन सर्व राज्यांना केले आहे. त्यात आपलेही राज्य असेल”, असं अजित पवार म्हणाले.
“या सर्व गोष्टींचा विचार करता चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी हायपॉवर कमिटी किंवा टास्क फोर्स आणि जगभरात काय केले जात आहे याचा अभ्यास करण्यासाठी आपण समिती नेमणार आहात का?”, असा प्रश्न अजित पवारांनी राज्य सरकारला विचारला.
“नवीन व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काळजी घेण्याची आवश्यकता आहे. बाकी कोणती यंत्रणा तात्काळ उभी करायची याचा अनुभव प्रशासनाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने कोरोनाची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली होती. त्यामुळे ‘कोरोना’चे गांभीर्य ओळखून राज्य सरकारने तातडीने पाऊले उचलावी”, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.