अजित पवार यांनी मौन सोडले…वेषांतर करुन दिल्लीला गेल्याबाबत प्रथमच केले भाष्य…
माझी बदनामी करण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. राज्यात वाचाळवीरांची संख्याही वाढली आहे. सकाळचा जो भोंगा असतो त्याच्याकडून उचलली जीभ लावली टाळ्याला, असा प्रकार होत असतो, असा हल्ला संजय राऊत यांचे नाव न घेता अजित पवार यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काही दिवसांपासून अडचणीत आले आहेत. भाजपसोबत सत्तेत जाण्यासाठी दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत बैठका झाल्या. त्या बैठकांना जाण्यासाठी मास्क आणि टोपी घालून विमानाने जात होतो. विमान प्रवासासाठी स्वतःचे नाव देखील बदलले होते, असे त्यांनीच खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना सांगितले, अशा बातम्या आल्या. यावेळी पत्रकारांसमोर दिल्लीपर्यंतच्या विमान प्रवासाचा संपूर्ण घटनाक्रम कथन केल्याचे म्हटले गेले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांना घेरले होते. त्यामुळे अजित पवार चांगलेच अडचणीत आले होते. त्यावर त्यांनी मौन सोडत खुलासा केला आहे. आपण वेषांतर करुन दिल्लीला गेल्याच्या बातम्या खोट्या आहेत. ते सिद्ध झाले तर राजकारण सोडू, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले अजित पवार
मला लपून छपून राजकारण करण्याची सवय नाही. परंतु वेगवेगळ्या बातम्या पेरुन आमची बदनामी केली जात आहे. फेक नॅरेटीव्ह तयार केले जात आहे. आमच्या चांगल्या योजना येत असल्याने विरोधक हादरले. त्यामुळे त्यांनी असे उद्योग चालवले आहे. मी वेशभूषा बदलून दिल्लीला गेलो हे साफ खोटे आहे. मला कुठे जायचे असेल उघडपणे जाईल. मला घाबरण्याची गरज नाही. वेषांतराचा आरोप खरे ठरले तर राजकारण सोडून देईल.
संजय राऊत यांच्यावर हल्ला
माझी बदनामी करण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. राज्यात वाचाळवीरांची संख्याही वाढली आहे. सकाळचा जो भोंगा असतो त्याच्याकडून उचलली जीभ लावली टाळ्याला, असा प्रकार होत असतो, असा हल्ला संजय राऊत यांचे नाव न घेता अजित पवार यांनी केला. ज्या वेळी हा प्रकार घडला तेव्हा मी विरोधी पक्षनेता होतो. समाजातील सर्वच लोक मला ओळखतात. त्यामुळे असे घडणे अशक्य आहे. सध्या हे जे चालले आहे ते सर्व चुकीचे आहे. त्या बातम्यांना काहीच आधार नाही. कुठलाई पुरावा नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
राज्यातील रस्त्यांवर निर्माण झालेले खड्डे बुजण्याचे आदेश दिले गेले आहे. त्यासाठी निधी दिला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.