किरीट सोमय्या यांचीही चौकशी करा, अजितदादा गटाचा भाजपला घरचा आहेर; सोमय्यांच्या अडचणी वाढणार?
निर्वस्त्र झालेल्या सोमय्या यांना राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यानी पोस्टाने पाठवलेली अनोखी भेट चांगलीच चर्चेत आहे. गल्ली पासून दिल्ली पर्यंत खळबळ माजवणारा हा व्हिडिओ सध्या देशात चर्चेचा विषय बनला आहे.
सोलापूर | 19 जुलै 2023 : भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या सध्या प्रचंड अडचणीत आहेत. सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने देशात खळबळ उडाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी सोमय्या यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. सोमय्या यांच्या विरोधात काल राज्यभरात निदर्शने करण्यात आली. आजही या प्रकरणी आंदोलने होण्याची शक्यता आहे. या घटनेचे विधानसभा आणि विधान परिषदेतही पडसाद उमटले. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर अजितदादा गटानेही या प्रकरणी भाजपला घरचा आहेर दिला आहे. या प्रकरणाची चौकशी कराच, पण किरीट सोमय्या यांचीही चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीने केली आहे.
किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओवरून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटलांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इतरांच्या नैतिकतेवर आरोप करणाऱ्या व्यक्तीने स्वतःच्या जीवनात नैतिकता जपणे आवश्यक आहे. सोमय्यांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये जे वर्तन दिसतंय, त्यामुळं त्यांची चौकशी होणं आवश्यक आहे. किरीट सोमय्या यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ निश्चितपणे खेदजनक आहे, असं उमेश पाटील म्हणाले.
सर्वात चिंतेची बाब
समाजातील अनैतिकतेच्या विरोधात आक्षेप घेऊन सरकारी यंत्रणाकडे रितसर तक्रारी करून शिक्षा मिळेपर्यंत पाठपुरावा करणे अशी ख्याती सोमय्या यांची होती. मात्र, सार्वजनिक जीवनात इतरांच्या नैतिकतेवर आरोप करणाऱ्या व्यक्तीने स्वतःच्या जीवनात नैतिकता जपणे ही आवश्यक बाब असते. सोमय्यांच्या व्हायरल व्हिडिओवरून जे वर्तन दिसतंय त्यामुळं त्यांची चौकशी होणं आवश्यक आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबद्दल आश्वासन दिलं आहे. कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. अशा घटनांमुळे मात्र समाज मनावर याचा निश्चितच परिणाम होतो. राजकीय नेत्यांबद्दल नकारात्मक भावना लोकांमध्ये होऊ शकते. ही सर्वात चिंतेची बाब आहे, असं पाटील म्हणाले.
पोस्टाने पँट, शर्ट पाठवली
दरम्यान, किरीट सोमय्या यांचा कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याने किरीट सोमय्यांना पोस्टाने कपडे पाठवलेत. किरीट सोमय्यांचा कथित अश्लील व्हिडीओ माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पुणे राष्ट्रवादीच्या संदीप काळे या कार्यकर्त्याने भाजपचे चिन्ह छापलेला शर्ट आणि BJP चे स्टिकर असलेली पॅन्ट पोस्टाने सोमय्या यांना पाठवलीय. व्हिडीओनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने केलेली ही कृती चर्चेचा विषय ठरली आहे.
जोडे मारो आंदोलन
निर्वस्त्र झालेल्या सोमय्या यांना राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यानी पोस्टाने पाठवलेली अनोखी भेट चांगलीच चर्चेत आहे. गल्ली पासून दिल्ली पर्यंत खळबळ माजवणारा हा व्हिडिओ सध्या देशात चर्चेचा विषय बनला आहे. सोमय्यांच्या या कृत्यामुळे विरोधी पक्षातल्या नेत्यांनीही त्यांचा चांगलाच समाचार घेत प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन ही केलं जातं आहेत. सोमय्या यांच्या फोटोला चपलेने मारलं जात आहे.